Tuesday, May 14, 2019

‘शाळा’ घेतलेल्या इमारती !



आपल्या काही आठवणींची आठवण हल्ली फेसबुक करून देत असतं. 'यु हॅव मेमरीज विथअसं नोटिफिकेशन येतं आणि आपण सुद्धा त्या दिवशी केलेल्या पोस्टमध्ये रमतो. ती आठवण रिशेअर सुद्धा करतो. मागे अशाच एका आठवणीचं नोटिफिकेशन आलं आणि मी ती आठवण शेअर केली.
'या इमारतीने आमची खऱ्या अर्थाने 'शाळाघेतलीअशी कॅप्शन लिहून माझ्या शाळेचा तो फोटो पुन्हा एकदा शेअर केला. बदलापूरची कै. द्वारकाबाई गणेश नाईक विद्यालय ही माझी शाळा.

मन आणखी थोडं मागे गेलं. आधीच्या शाळेकडे धाव घेतली मनाने. पाचवीपर्यंत कल्याणच्या गजानन विद्यालय या शाळेत शिकले. या शाळेतच माझी आई आणि सख्खी आत्या या दोघी शिक्षका होत्या. मी जरा कुठे मस्ती केलीखोड्या काढल्या की दोघींकडे लगेच रिपोर्ट जायचा. त्यामुळे जबाबदारीने वागणं हे आलंच. माझ्या या शाळेत फार मोठं मैदान नव्हतं. त्यामुळे स्पोर्ट्स डेला आम्हाला शाळेजवळच्याच एका मैदानात जावं लागे. त्या वेळी आम्हा मुलांचा हिरमोड व्हायचा. पण तेव्हा समोर असलेल्या गोष्टीशी 'जमवूनघ्यायला आम्ही शिकलो. दुसऱ्या मैदानात जावं लागलं तरी तिथे गेल्यावर आमचा दंगा सुरू. गोष्टी पटकन स्वीकारून पुढे जाणं हेही नकळतपणे अंगवळणी पडलं.

पुढच्या शिक्षणासाठी बदलापूरच्या नाईक विद्यालयात गेले. तिथे स्पर्धेत कसं शिरायचं आणि कसं टिकून राहायचं हे कळलं. अभ्यासात मी जितक्या टक्केवारीवर असायचे त्याच वर्गात तसे आणखी बरेच जण होते. त्यामुळे तिथे स्पर्धा सुरू झाली होती. प्रत्येक परीक्षेनंतर मी एका वहीच्या शेवटच्या पानावर स्पर्धेत असलेल्या सगळ्यांची नावं, विषय असा एक छोटा तक्ता तयार करायचे. कोणत्या विषयात कोणाला किती गुण मिळाले हे लिहायचे. त्याची बेरीज करून टक्केवारी काढायचे. नंबर द्यायचे. हो, हे सगळे उद्योग मी केले आहेत. या तक्त्यात मी कधी पहिल्या दहात असायचे तर कधी नसायचे. पण म्हणून त्यापैकी कोणासोबतही माझी मैत्री बिघडली नाही. आजही तितकीच तशीच चांगली आहे. हेच मला त्या शाळेने शिकवलं. स्पर्धेत सहभागी व्हा. पण ती तेवढ्यापुरतं ठेवा. कधी हराल, कधी जिंकाल, कधी अधेमधे रहाल. पण त्याने नुकसान होणार नाही.

मुलुंडच्या वझे केळकर कॉलेजची बातच वेगळी. घरापासून लांब असलेल्या कॉलेजमध्ये जायचं म्हणजे थ्रील होतं माझ्यासाठी. पाच वर्ष धमाल केली या कॉलेजमध्ये. स्टेज फिअर काय असतं ते प्रत्यक्षात इथे अनुभवलं. तिथेच त्यावर मातही केली. अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला. कार्यक्रम आयोजित केले. वेळोवेळी आलेली आव्हानं शिताफिने पेलली. अशा स्पर्धांमधूनच लोकांशी बोलायला शिकले, असंख्य लोक संपर्कात आले. ते आजही ओळखतात, बोलतात. मध्यभागी मैदान आणि त्याच्या चारही बाजूंनी पसरलेली इमारतअसं आमचं कॉलेज. मैदानात उभं राहून इमारतीकडे बघितलं की मनात येणारी भावना चेहऱ्यावर हसू आणल्याशिवाय राहत नाही.

पत्रकारितेच्या शिक्षणासाठी गाठलं ते झेविअर्स कॉलेजचं झेविअर इन्स्टिट्युट ऑफ कम्युनिकेशन. इथे सगळ्यात महत्त्वाची आणि पुढे प्रचंड उपयोगी ठरलेली गोष्ट मी शिकले. आपल्या स्वभावाविरुद्ध स्वभाव असलेल्या व्यक्तीशी जमवून घेणं. ते कॉलेज सोडून आता दहा वर्षं होतील. पण आजही तिथे गेलं की त्या जागेमधला आपलेपणा जाणवतो. आम्हाला अनेक प्रोजेक्ट्स करावे लागे. त्यावेळी वेगवेगळ्या विद्यार्थ्यांसोबत ते करावं लागे. अशावेळी एका गटात असलेल्या सगळ्या सदस्यांशी जमायचंच असं अजिबात नव्हतं. खटके उडायचेच. पण तेव्हा कळलेला एक मंत्र म्हणजे; न पटणारे लोक नोकरीच्या ठिकाणीही असंख्य मिळतील. तेव्हा सतत नोकरी बदलण्याचा पर्याय नसणार. त्यांच्याशी जमवून घ्यावंच लागेल. नोकरी टिकवावीच लागेल. नोकरीच्या ठिकाणी अशी न पटणारी व्यक्ती समोर आली की तो मंत्र कायम आठवतो.

आपण शाळाकॉलेजमध्ये बरंच काही शिकतो. कधी शिक्षक तर कधी मित्रपरिवार शिकवतो. ती वास्तुसुद्धा आपल्याला काही सांगू पाहत असते. या वास्तुंबद्दलच्या असंख्य आठवणी आपल्या मनात असतात. खरं तर वास्तु म्हणजे निर्जीव गोष्ट; तरीसुद्धा ती जागातिथल्या वाईब्स हव्याहव्याशा वाटतात. माझ्यासाठी मग ते झेविअर्समधलं कॅंटीन असोनाईक विद्यालयातील मोठं झाडकेळकर कॉलेजमधली तालीम करायची एसआरसीची जागा किंवा गजानन विद्यालयातील बेसमेंटसारखी प्रार्थना म्हणायची जागा... हे आजही खूप स्पष्ट आठवतं. माझ्या बॅचमधल्या बऱ्याच जणांना कधी कधी असं वाटतंआपल्याला आपल्या शाळेने, कॉलेजने काय दिलंकाहीच नाही. मला मात्र नेहमी वाटतंते आपल्याला भरभरून देत असतं. आपल्याला ते दिसलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा परिणाम हा आपल्या प्रगतीशी, विकासाशी, आर्थिक स्थैर्याशी कसा ठरवता येईल? आणि तो का असावाकधीतरी ती फक्त एक शिकण्याची प्रक्रिया नसू शकते का? त्यामुळे माझं माझ्या सगळ्या शाळांवर, कॉलेजांवर, नोकरी केलेल्या आणि करत असलेल्या सगळ्या इमारतींवर आजही तितकंच प्रेम आहे आणि ते कायम राहील.

मी इथेच धडपडलेइथेच आपटलेइथेच हरले. इथेच जिंकलेहीइथेच शिकलेइथेच सावरले आणि इथेच मोठीही झाले...
खऱ्या अर्थाने या इमारतींनी माझी 'शाळाघेतली !


Wednesday, March 6, 2019

संघर्ष.... त्याचा... तिचा... सगळ्यांचाच !


संघर्ष कोणालाच चुकलेला नाही. प्रत्येकाच्या संघर्षाचं स्वरूप मात्र वेगळं असतं. मानसिक, शारीरिक, आर्थिक, भावनिक... असं काहीही. जो तो त्याच्या परीने लढत असतो. प्रत्येकाची कथा वेगळी असते. अशा संघर्षाच्या अनेक कथा आजवर मोठ्या पडद्यावर दिसल्या आहेत. यातली ताजी कथा म्हणजे मुरादची. 'गली बॉय' या सिनेमातला मुराद. रॅपर बनण्याचं त्याचं स्वप्न तो जगतो आणि पूर्ण करतोही. पण त्यासाठी त्याला करावा लागणारा संघर्ष नाट्यमय पद्धतीने दिग्दर्शक झोया अख्तर हिने पडद्यावर रंगवला आहे. झोया मुरादचा संघर्ष दाखवतानाच इतरही काही पात्रांचा संघर्ष नकळतपणे प्रेक्षकांच्या समोर आणते. या इतर पात्रांची गुंफण तिने मुरादच्या कथेसोबत उत्कृष्टरित्या केली आहे. मुरादची आई, सफिना, एमसी शेर, मुरादचा मित्र मुइन या सगळ्यांचा संघर्ष चित्रपटात दिसतो. चित्रपटाचं हे समीक्षण नाही. पण त्यातून मला दिसलेला हा धागा मी मांडतेय. हा धाग्याचा पोत सारखा असला तरी त्याचा रंग मात्र वेगळा आहे.

कमी वयाच्या मुलीशी लग्न करून मुरादचे वडील तिला घरी घेऊन येतात. अर्थात मुरादच्या आईला ते आवडत नाही. पचतही नाही. तिची घुसमट धारावीतल्या तिच्या छोट्या घरासारखीच आत आत चिकटून बसते. आपली सवत नोकरी करते, पैसे कमवते हे न बोलता तिला खुपत असतं. तिच्या मनातली असुरक्षितता कधी तिच्या नजरेतून तर कधी तिच्या बोलण्या-वागण्यातून स्पष्ट जाणवते. मुरादचे वडील त्याचा रॅपचा व्हिडीओ बघून त्याला मारतात. त्याची नवी आई मात्र तिला तो व्हिडीओ आवडल्याचं त्याच्या कानात सांगते. ती तिथून निघून गेल्यानंतर मुरादची आई त्याच्या गालाला हात लावते. मुरादला ती आता जवळ घेईल असं वाटतं पण तसं होत नाही. ती त्याच्या जवळ येऊन म्हणते, 'क्या बोली वो?' आपला नवरा तर तिने तिच्या बाजूने करून घेतलाच पण आता मुलालाही करते की काय ही असुरक्षितता तिला तसं करण्यास भाग पाडते. आपल्या घरात आपलं स्थान पक्क करण्यासाठी, महत्त्वाचं बनवण्यासाठी मुरादच्या आईचा संघर्ष मोजक्या प्रसंगांतून आणि संवादातून भक्कम उभा राहतो.

मुरादच्या आईप्रमाणे असुरक्षित वाटतं सफिनाला. मुरादवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सफिनाचा संघर्ष दोन गोष्टींसाठी असतो. मुरादला दुसरं कोणाचं होऊ द्यायचं नाही आणि मनाला हवं तसं स्वतंत्र जगायचं. मुरादच्या संपर्कात आलेल्या दोन मुलींना ती कसलाच विचार न करता बुकलून काढते. तिच्यावर अनेक बंधनं असल्याने नाईलाजाने खोटं बोलून मनमोकळं जगण्याचा संघर्ष ती सतत करत असते. तिचं प्रेम हातातून सुटतंय असं तिला वाटतं. तसं होऊ नये म्हणून तिचा संघर्ष तिच्या प्रत्येक कृतीतून, देहबोलीतून सतत दिसतो.  

एमसी शेरचा संघर्ष संवादरुपातून समोर येत नसला तरी फार बोलका आहे. तो लोकप्रिय आणि उत्तम रॅपर असतो. घरची परिस्थिती बेताचीच. खरं तर त्यापेक्षा थोडी कमीच. पण आहे त्या परिस्थितीशी लढून त्याचं आणि नंतर सोबतीला आलेल्या मुरादचं स्वप्न साकार करण्याचा संघर्ष एमसी शेरच्या देहबोलीतून सतत दिसतो. मुइनचा संघर्ष पैसे कमवून स्वत:चं आणि त्याच्याकडे काम करणाऱ्या मुलांचं पोट भरण्यासाठीचा आहे. त्याच्याकडे असलेल्या मुलांना मुइन चुकीच्या मार्गाने काम करायला लावतो; हे मुरादला पटत नाही. तो वारंवार त्याला ते करण्यापासून रोखतोही. पण जिन माँ-बापने इन्हे छोड दिया उनको जाके पुछ की उन्होने इनके साथ ऐसा क्यु किया, मैं इन बच्चोंका पेट भरता हूँ, असं तो मुरादला ठणकावून सांगतो. त्यातून मुइनचा संघर्ष स्पष्ट दिसतो. 

मानवी भावभावनांचा गुंता कसा घालायचा आणि तो कसा सोडवायचा यात दिग्दर्शक झोया अख्तर प्रचंड हुशार आहे. तिच्या दिग्दर्शनाची ही छटा तिच्या प्रत्येक सिनेमात दिसली आहे. सिनेमातल्या पात्रांचा संघर्ष दाखवताना झोयाचा दिग्दर्शक म्हणून एक वेगळाच संघर्ष सुरू होता असं सिनेमा बघताना सतत जाणवतं. लक बाय चान्स, जिंदगी ना मिलेगी दोबारा, दिल धडकने दो हे तिचे सिनेमे. सगळे सिनेमे उच्चभ्रू वर्गातून फिरतात. त्यातही अनेक पात्रांचा संघर्ष दाखवला आहे. लक बाय चान्समध्ये फरहानचा हिरो बनण्याचा आणि नंतर तो टिकवण्याचा संघर्ष, जिंदगी ना मिलेगा दोबारामध्ये अभय देओलचा त्याच्यावर लादलेल्या लग्नाच्या निर्णयाचं ओझं हलकं करण्याचा संघर्ष, दिल धडकने दो सिनेमात प्रियंका चोप्राचा लग्नाच्या बंधनातून बाहेर पडण्याचा संघर्ष.... असा मानवी भावनांचा संघर्ष तिच्या सिनेमांमधून बघायला मिळतो. विचित्र परिस्थितीत कचाट्यात अडकलेल्या मानवी मनाचा संघर्ष तिला चांगलाच ठाऊक झालेला दिसतो. झोयाने आजवर केलेल्या सिनेमांमधली कुटुंबं उच्चभ्रू वर्गातली आहेत. गली बॉयमध्ये मात्र त्याच्या अगदी विरुद्ध चित्र दिसतं. उच्चभ्रू वर्गाचं चित्रण दाखवण्यात सराईत असलेली झोया तितक्याच खुबीने धारावीचा स्वभाव बऱ्यापैकी ओळखून आहे, याचा प्रत्यय सिनेमातून येतो. कोणत्याही आर्थिक स्तरातील बारकावे; मग ते बोलण्यातले असो, वागण्यातले असो किंवा मानसिकतेतले; ती जाणून आहे. आणि म्हणूनच गली बॉयमध्ये तिच्या आधीच्या सिनेमांची झलक दिसत नाही. आजवर न हाताळलेल्या आर्थिक स्तरातील गोष्ट दाखवण्याचा संघर्ष झोयाने गली बॉयमधून केला. मुरादसोबत इतर पात्रांचा, दिग्दर्शक झोयाचा आणि नकळतपणे आपल्या आयुष्यातला आपला संघर्ष पुन्हा एकदा गली बॉयमधून अनुभवता येतो.



Saturday, February 16, 2019

विशीतून तिशीत....



वाढदिवसाविषयी अनेकांना अप्रुप वाटतं. मलाही वाटतं. पण आता वयोमानानुसार त्याच अप्रुप कमी कमी होतंय. पण या वर्षीचा माझा वाढदिवस खास होता. या वर्षी मी विशीतून तिशीत प्रवेश केला. ३० वर्षं पूर्ण! मुलींना वय विचारू नये, असं का म्हणतात हे मला आजतागायत कळलेलं नाही. कळून घ्यायचंही नाही. मला माझं वय सांगायला कधीच लाज वाटली नाही. वाटणारही नाही. वय आहे ते.. लपवून ठेवायला खजिना नाही. तुम्ही कितीही लपवलंत तरी ते समोर येतच. पण हे वय समोर आलं की मात्र काही जण बिलकुल गप्प बसत नाहीत. एखादी मुलगी ३० वर्षांची झाली म्हणून इतरांनाच जास्त काळजी असते. माझ्या कित्येक मैत्रिणींच्या बाबतीत असे प्रसंग घडलेले मी पाहिलेले, ऐकलेले आहेत. त्या मुलीचं लग्न झालं नसेल तर मग कधी करणार आता लग्न? ’, जर तिला एखादा मुलगा आवडला असेल पण इतक्यात लग्न करणार नसेल तर आता तरी करा लग्न. ३० पूर्ण झाले ना. पुढे सगळं जड जाईल हा आणि जर एखाद्या ३० वर्षीय तरुणीचं लग्न झालं असेल आणि तिच्या लग्नाला साधारण दोन-चार वर्ष झाली असतील तर अगं अजून किती प्लॅनिंग करणार? आता करा विचार हा प्रश्न तिला थेट विचारला जातो. तर कधी अडूनअडून खुसपुस करत तिच्या लग्नाला चार वर्षं झाली ना. तिचं वयही वाढतंय तरी अजून तिला मूल नाही ?’ असं गॉसिप केलं जातं. या सगळ्या फुकटच्या चौकशा करणाऱ्यांना मला एकच सांगावसं वाटतं, ‘तुम्ही तुमचं बघा... आणखी सोप्या आणि स्पष्ट शब्दांत सांगायचं तर, धिस इज नन ऑफ युवर बिझनेस!’….

एखाद्या विवाहित तरुणीचं अचानक वजन वाढलं असेल; तर ती गरोदर आहे वाटतं अशी शंका व्यक्त केली जाते. तसंच ती बरेच दिवस माहेरी राहायला गेली असेल तर या वेळी खूप दिवस राहिली ना ती. काही गडबड आहे का? ’ ही गडबड म्हणजे गरोदरपणा... मला या दोन्ही वाक्यातलं लॉजिक कळत नाही. वजन वाढण्यामागे इतर अनेक कारणं असूच शकतात, हा साधा विचार अशा लोकांना का शिवत नाही? आणि माहेरी काही 'गडबड' असेल तरच इतके दिवस राहता येतं का? या प्रश्नाचं उत्तर मिळेल का? आपल्याकडे ना ठरलेलं असतं. अमुक वर्षी लग्न आणि अमुक वर्षी मूल जन्माला घालणं. हे ठरवणार कोण? जिच्या पोटात, शरीरात ते मूल वाढणार आहे तिने काहीच ठरवायचं नाही का? उलट तिनेच ठरवायला हवं. तिशीत असलेल्या विवाहित तरुणीला मूल नाही हा अजूनही टॅबू का वाटतो लोकांना ? तसंच त्याच वयाच्या मुलीचं लग्न झालं नसेल तर ती लाजिरवाणी गोष्ट का वाटते?  लोक काय म्हणतील हा अतिशय ओव्हररेटेड विचार मुळापासून कधी उपटून काढणार?

आजवर वयाचे काही महत्त्वाचे टप्पे पार केले. १८ वं वर्ष, विशीची सुरूवात, २५ वं वर्ष आणि आता ३० वं वर्षं... यानंतरही अनेक महत्त्वाचे टप्पे पार करायचे आहेत. पण ही वर्ष एखाद्याचं आयुष्य स्थिरस्थावर होण्यासाठी महत्त्वाची असतात. म्हणून त्यांचं विशेष महत्त्व वाटतं. हे सगळे टप्पे उत्साह, ऊर्जा देणारे असतात. पण प्रत्येक टप्प्याला काहीना काही साइड एफेक्ट्स असतातच. कदाचित ते तुम्हाला थेट दिसणार नाहीत पण सभोवतालच्या परिस्थितीमुळे, लोकांमुळे जाणवतील हे नक्की. ते हाताळण्याचं विशेष कौशल्य अंगी असायलाच हवं.

एखाद्या तरुणीच्या वयाचा संबंध तिच्या लग्न आणि तिला मूल होणं याच्याशीच जोडला जातो. तिच्या नोकरीशी कधीच कसा जोडला जात नाही? एखाद्या २८ वर्षीय तरुणीबाबत ती अजून सेटल झाली नाही. तिला चांगली नोकरी मिळाली नाही असं का बोललं जात नाही? ‘तिचं २८ वय आहे. लग्नासाठी बघायला सुरूवात करु या हे लगेच ऐकायला मिळतं. योग्य वेळी लग्न आणि मूल होणं  याबाबत बोलण्याचा हेतू शास्त्रीयदृष्ट्या बरोबर असला तरी त्यात तिसऱ्या व्यक्तीने कितपत हस्तक्षेप करायचा हा प्रश्न उरतोच. काहींची त्यामागे फक्त आणि फक्त काळजीच असली तरीही त्यातही त्यांनी किती बोलावं याही प्रश्नाचा विचार करावा. तरुणीने लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर तिला मूल झालं म्हणजेच तिच्या आयुष्याला पूर्णविराम लागला असं नसतं. तसं नसावंच. या सगळ्यामागची सगळ्या प्रकारची कारणं माहित असली तरी त्या तरुणीला लग्न आणि मूल होणं याबाबत सतत टोचण्यात काय अर्थ आहे! पण हे सगळं त्यांना समजत नसेल तर धिस इज नन ऑफ युवर बिझनेस'; असंच म्हणण्याची वेळ येईल. 


Saturday, January 26, 2019

वेळापत्रक


वेळापत्रक.... हा शब्द आपल्या सगळ्यांच्या अगदी खूप जवळचा. अगदी लहानपणापासून याभोवती आपण फिरतो. शाळेत असताना दप्तर भरताना दुसऱ्या दिवशीचं वेळापत्रक बघितलं जायचं. कॉलेजमध्ये असताना ते पाठ असायचं. पुढे नोकरीच्या ठिकाणी दिवसभराच्या कामाचं वेळापत्रक. पण हे सगळं करत असताना आपण आपल्या आयुष्याचंही एक वेळापत्रक बनवत असतो. शाळा संपली की कोणत्या शाखेत पुढचं शिक्षण घ्यायचं., ग्रॅज्युएशन कशात करायचं, त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन कुठून आणि कधी करायचं, मधे एखादा ब्रेक घ्यायचा का, नोकरी कितव्या वर्षी लागायलाच हवी, एका ठिकाणी किती वर्ष नोकरी करायची, नोकरी बदलताना कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायचं, नोकरीत स्थिरावलो की लग्न करायचं, लग्न झालं की मूल कोणत्या वर्षी होऊ द्यायचं, मुलांसाठी आणि आपल्या वृद्धापकाळासाठी आर्थिक तरतूद किती आणि कधीपासून सुरु करायची, देश-जग फिरायचं आहे वगैरे वगैरे.... किती कॅल्युलेटेड जगतो आपण....! हो आपण सगळेच. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आपल्याच आयुष्याचं वेळापत्रक आखत असतो. या वेळापत्रकात सतत असंख्य क्रिया असतात. बऱयाच इच्छा, आकांक्षा, स्वप्न असतात. काही पूर्ण होतात, काही पूर्ण होण्याच्या मार्गावर असतात, काही पूर्ण होत नाहीत तर काही मनातच राहतात... कायम...

आयुष्याच्या या वेळापत्रकात एका गोष्टीचा विसर पडतो. मृत्यु....! खरं तर ते कोणी विसरत नाही पण त्याची या वेळापत्रकात दखल घ्यावी असं फारसं कोणाला वाटत नाही. भीती हे त्यामागचं कारण असू शकतं. पण मृत्यु हे अंतिम सत्य आहे आणि ते प्रत्येकाला कधी ना कधी तरी स्वीकारावंच लागतं. या वेळापत्रकात प्रत्येक गोष्ट साध्य करण्यासाठी आपण सगळेच जीवाचं अगदी रान करतो. ठरल्याप्रमाणे ती तशीच कशी मिळेल यासाठी झटत असतो. स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रचंड मेहनत करतो. व्यावसायिक, वैयक्तिक अशा दोन्ही आयुष्याच्या वेळापत्रकासोबतच आपण सतत धावत असतो. पण, का? कशासाठी? कोणासाठी? धावायची खरंच इतकी गरज आहे का? खरं तर बिलकुलच नाही... नाही मिळाली एखादी गोष्ट तर बिघडलं कुठे? नाही झालं प्रमोशन तर आभाळ कोसळणार आहे का? नाही मिळाला आनंद एखाद्या गोष्टीचा तर आयुष्य बेचव होणार आहे का? सुटली एखादी गोष्ट तुमच्या हातून तर श्वास घ्यायचा थांबणार आहात का? यापैकी काहीच होणार नाही तर मग इतका आटापिटा का? हा आटापिटा केलाच तरी तुम्हाला हवं ते सगळंच साध्य होईल याची खात्री कुठे आहे? या धावपळीत तुम्ही तुमचं मन किती जपता, तुम्ही स्वत:ला किती वेळ देता, आरोग्याकडे किती लक्ष देता, तुम्हाला काय वाटतं याला किती महत्त्व देता?

जर तुमचं आयुष्य अर्ध्या वाटेवर थांबलं किंवा संपलं तर???  थांबणं आणि संपणं यात फरक आहे. पण दोन्ही गोष्टी कोणालाच नको असतात. जर थांबलं तर ते पुन्हा सुरु होण्याची किमान शक्यता तरी असते. पण जर ते संपलं तर तुम्ही आखलेलं तुमचं आयुष्याचं वेळापत्रकही त्याचबरोबर संपतं. तुमच्या मनातल्या इच्छा तिथेच नष्ट होतात, तुमच्या स्वप्नांचा शेवट होतो, तुमच्या मतांचा, विशिष्ट विषयाबाबत तुम्ही घेतलेल्या भूमिकेचा तिथेच अंत होतो. तुम्ही आज संपलात तर तुम्हाला उद्या काय करायचं होतं हेदखील संपतं. एका झटक्यात होत्याचं नव्हतं होतं ! सहा महिन्यांपूर्वी माझ्या नवऱ्याचा म्हणजे चैतन्यचा अत्यंत जवळचा, अगदी जिवलग मित्र हृदयविकाराने गेला. वय वर्ष ३२. ऑफीसला जाताना बस स्टॉपवर अचानक कोसळला. वीस मिनिटात संपलं सगळं. हे काय वय होतं का जाण्याचं ? खरं तर हा प्रश्न किती चुकीचा आहे. आपण कोण ठरवणारे आपण कधी जाणार ते? आपण जर आपल्या वेळापत्रकात आपल्या मृत्युला समाविष्टच करुन घेतलं नाहीये तर त्याची वेळ ठरवण्याचा आपल्याला हक्कच नाही. त्याच्या जाण्याने धक्का मात्र बसला. मनात विचार आला की त्याने त्यानंतरच्या वीकेण्ड्सचे प्लॅन्स केले असतील, गेल्या वर्षीच्या गणेशोत्सवात कोणाकडे जायचं हे ठरवलं असेल, पावसाळ्यात कुठे पिकनिकला जायचं, काहीतरी शिकायचंय असं बरंच काही त्याने ठरवलं असेल.. ते सगळं त्याच्यासोबतच गेलं.. कायमच...! आपल्या जगण्याची निश्चितता आपणच ठामपणे सांगू शकत नाही. जगात एकच गोष्ट निश्चित असते ती म्हणजे अनिश्चितता ! मृत्यु इतकंच हेही सत्य पचायला हवं !

असंच सगळं होणार असेल तर काय उपयोग त्या वेळापत्रकाचा ? कशासाठी करायचं वेळापत्रक ? तेही आयुष्याचं ? तुम्ही म्हणाल वेळापत्रक अगदीच नाही केलं तर आयुष्य सैरभैर होईल, कसलीच शिस्त नसेल, कोणीही कसंही वागेल, कुटुंबव्यवस्थेची घडी विस्कटेल... पण ठाम वेळापत्रक न करताही आयुष्यात अनेक गोष्टी साध्य करता येतातच, हेही स्वीकारायलाच हवी. वेळापत्रकाला चिकटून बसायला नको. आपण आणि आपलं वेळापत्रक फ्लेक्झिबल असलं पाहिजे. त्याच्यावर अडून बसलो की संपतं सगळं. चैतन्यच्या मित्राने असं वेळापत्रक केलं होतं की नाही माहित नाही. पण आपण सगळेच अप्रत्यक्षपणे ते उराशी बाळगून असतो. त्याला म्हणावा तसा ताणही नव्हता. कुटुंबही चांगलं. मित्रपरिवारही छान. त्यामुळे तो कसल्या तणावामुळे गेला असं वाटत नाही. पण कदाचित त्याने आखलेल्या वेळापत्रकाच्या धावपळीशी त्याला जमवून घेता आलं नसावं. याच वेळापत्रकामुळे त्याचं त्याच्या आरोग्याकडे दुर्लक्ष झालं असावं किंवा त्याने त्याकडे लक्ष द्यायला हवं हे त्याला कळलं नसावं. जे झालं ते वाईटच आहे. याआधीही आजूबाजूला असं वय कमी असलेल्या लोकांच्या जाण्याच्या बातम्या कळल्या आहेत. पण त्या मित्राचा उल्लेख अगदी रोज माझ्या आणि चैतन्यच्या बोलण्यात यायचा. त्यामुळे मी त्याला फारशी भेटली नसले, बोलले नसले तरी त्याचं अस्तित्व नेहमी जाणवायचं. जाणवत राहील.

या सगळ्यातून मला एक गोष्ट कळून चुकली की आपल्याला वेळापत्रक आखायचंच असेल तर त्यावर मातही करता आली पाहिजे. गोष्टी वेळीच स्वीकारल्या पाहिजेत. आपलं वेळापत्रक हे अत्यंत फ्लेक्झिबल म्हणजे लवचिक असायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं थोडं थांबायला हवं, मोकळा श्वास घ्यायला हवा, डोक्यावरचं ओझं थोडावेळ का होईना खाली उतरवायलाच हवं !