
कमी वयाच्या मुलीशी लग्न करून मुरादचे वडील तिला घरी
घेऊन येतात. अर्थात मुरादच्या आईला ते आवडत नाही. पचतही नाही. तिची घुसमट
धारावीतल्या तिच्या छोट्या घरासारखीच आत आत चिकटून बसते. आपली सवत नोकरी करते, पैसे
कमवते हे न बोलता तिला खुपत असतं. तिच्या मनातली असुरक्षितता कधी तिच्या नजरेतून
तर कधी तिच्या बोलण्या-वागण्यातून स्पष्ट जाणवते. मुरादचे वडील त्याचा रॅपचा
व्हिडीओ बघून त्याला मारतात. त्याची नवी आई मात्र तिला तो व्हिडीओ आवडल्याचं त्याच्या
कानात सांगते. ती तिथून निघून गेल्यानंतर मुरादची आई त्याच्या गालाला हात लावते.
मुरादला ती आता जवळ घेईल असं वाटतं पण तसं होत नाही. ती त्याच्या जवळ येऊन म्हणते, 'क्या
बोली वो?' आपला नवरा तर तिने तिच्या बाजूने करून घेतलाच पण आता
मुलालाही करते की काय ही असुरक्षितता तिला तसं करण्यास भाग पाडते. आपल्या घरात
आपलं स्थान पक्क करण्यासाठी,
महत्त्वाचं बनवण्यासाठी मुरादच्या आईचा संघर्ष मोजक्या
प्रसंगांतून आणि संवादातून भक्कम उभा राहतो.
मुरादच्या आईप्रमाणे असुरक्षित वाटतं सफिनाला. मुरादवर
जीवापाड प्रेम करणाऱ्या सफिनाचा संघर्ष दोन गोष्टींसाठी असतो. मुरादला दुसरं
कोणाचं होऊ द्यायचं नाही आणि मनाला हवं तसं स्वतंत्र जगायचं. मुरादच्या संपर्कात
आलेल्या दोन मुलींना ती कसलाच विचार न करता बुकलून काढते. तिच्यावर अनेक बंधनं
असल्याने नाईलाजाने खोटं बोलून मनमोकळं जगण्याचा संघर्ष ती सतत करत असते. तिचं
प्रेम हातातून सुटतंय असं तिला वाटतं. तसं होऊ नये म्हणून तिचा संघर्ष तिच्या
प्रत्येक कृतीतून, देहबोलीतून सतत दिसतो.
एमसी शेरचा संघर्ष संवादरुपातून समोर येत नसला तरी फार
बोलका आहे. तो लोकप्रिय आणि उत्तम रॅपर असतो. घरची परिस्थिती बेताचीच. खरं तर
त्यापेक्षा थोडी कमीच. पण आहे त्या परिस्थितीशी लढून त्याचं आणि नंतर सोबतीला
आलेल्या मुरादचं स्वप्न साकार करण्याचा संघर्ष एमसी शेरच्या देहबोलीतून सतत दिसतो.
मुइनचा संघर्ष पैसे कमवून स्वत:चं आणि त्याच्याकडे काम करणाऱ्या मुलांचं पोट
भरण्यासाठीचा आहे. त्याच्याकडे असलेल्या मुलांना मुइन चुकीच्या मार्गाने काम
करायला लावतो; हे मुरादला पटत नाही. तो वारंवार त्याला ते करण्यापासून
रोखतोही. पण ‘जिन माँ-बापने इन्हे छोड दिया उनको जाके पुछ की उन्होने
इनके साथ ऐसा क्यु किया,
मैं इन बच्चोंका पेट भरता हूँ’,
असं तो मुरादला ठणकावून सांगतो. त्यातून मुइनचा संघर्ष स्पष्ट दिसतो.
मानवी भावभावनांचा गुंता कसा घालायचा आणि तो कसा सोडवायचा यात दिग्दर्शक झोया अख्तर प्रचंड हुशार आहे. तिच्या दिग्दर्शनाची ही छटा तिच्या प्रत्येक सिनेमात दिसली आहे. सिनेमातल्या पात्रांचा संघर्ष दाखवताना झोयाचा दिग्दर्शक म्हणून एक वेगळाच संघर्ष सुरू होता असं सिनेमा बघताना सतत जाणवतं. ‘लक बाय चान्स’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, ‘दिल धडकने दो’ हे तिचे सिनेमे. सगळे सिनेमे उच्चभ्रू वर्गातून फिरतात. त्यातही अनेक पात्रांचा संघर्ष दाखवला आहे. लक बाय चान्समध्ये फरहानचा हिरो बनण्याचा आणि नंतर तो टिकवण्याचा संघर्ष, जिंदगी ना मिलेगा दोबारामध्ये अभय देओलचा त्याच्यावर लादलेल्या लग्नाच्या निर्णयाचं ओझं हलकं करण्याचा संघर्ष, दिल धडकने दो सिनेमात प्रियंका चोप्राचा लग्नाच्या बंधनातून बाहेर पडण्याचा संघर्ष.... असा मानवी भावनांचा संघर्ष तिच्या सिनेमांमधून बघायला मिळतो. विचित्र परिस्थितीत कचाट्यात अडकलेल्या मानवी मनाचा संघर्ष तिला चांगलाच ठाऊक झालेला दिसतो. झोयाने आजवर केलेल्या सिनेमांमधली कुटुंबं उच्चभ्रू वर्गातली आहेत. ‘गली बॉय’मध्ये मात्र त्याच्या अगदी विरुद्ध चित्र दिसतं. उच्चभ्रू वर्गाचं चित्रण दाखवण्यात सराईत असलेली झोया तितक्याच खुबीने धारावीचा स्वभाव बऱ्यापैकी ओळखून आहे, याचा प्रत्यय सिनेमातून येतो. कोणत्याही आर्थिक स्तरातील बारकावे; मग ते बोलण्यातले असो, वागण्यातले असो किंवा मानसिकतेतले; ती जाणून आहे. आणि म्हणूनच ‘गली बॉय’मध्ये तिच्या आधीच्या सिनेमांची झलक दिसत नाही. आजवर न हाताळलेल्या आर्थिक स्तरातील गोष्ट दाखवण्याचा संघर्ष झोयाने ‘गली बॉय’मधून केला. मुरादसोबत इतर पात्रांचा, दिग्दर्शक झोयाचा आणि नकळतपणे आपल्या आयुष्यातला आपला संघर्ष पुन्हा एकदा ‘गली बॉय’मधून अनुभवता येतो.