आपल्या काही आठवणींची आठवण हल्ली फेसबुक करून देत असतं. 'यु हॅव मेमरीज विथ' असं नोटिफिकेशन येतं आणि आपण सुद्धा त्या दिवशी केलेल्या पोस्टमध्ये रमतो. ती आठवण रिशेअर सुद्धा करतो. मागे अशाच एका आठवणीचं नोटिफिकेशन आलं आणि मी ती आठवण शेअर केली.
मन आणखी थोडं मागे गेलं.
आधीच्या शाळेकडे धाव घेतली मनाने. पाचवीपर्यंत कल्याणच्या गजानन विद्यालय या शाळेत
शिकले. या शाळेतच माझी आई आणि सख्खी आत्या या दोघी शिक्षका होत्या. मी जरा कुठे
मस्ती केली, खोड्या काढल्या की दोघींकडे
लगेच रिपोर्ट जायचा. त्यामुळे जबाबदारीने वागणं हे आलंच. माझ्या या शाळेत फार मोठं
मैदान नव्हतं. त्यामुळे स्पोर्ट्स डेला आम्हाला शाळेजवळच्याच एका मैदानात जावं
लागे. त्या वेळी आम्हा मुलांचा हिरमोड व्हायचा. पण तेव्हा समोर असलेल्या गोष्टीशी 'जमवून' घ्यायला आम्ही शिकलो.
दुसऱ्या मैदानात जावं लागलं तरी तिथे गेल्यावर आमचा दंगा सुरू. गोष्टी पटकन स्वीकारून पुढे जाणं हेही
नकळतपणे अंगवळणी पडलं.
पुढच्या शिक्षणासाठी
बदलापूरच्या नाईक विद्यालयात गेले. तिथे स्पर्धेत कसं शिरायचं आणि कसं टिकून राहायचं
हे कळलं. अभ्यासात मी जितक्या टक्केवारीवर असायचे त्याच वर्गात तसे आणखी बरेच जण
होते. त्यामुळे तिथे स्पर्धा सुरू झाली होती. प्रत्येक परीक्षेनंतर मी एका वहीच्या
शेवटच्या पानावर स्पर्धेत असलेल्या सगळ्यांची नावं, विषय असा एक छोटा तक्ता तयार करायचे. कोणत्या विषयात कोणाला किती गुण
मिळाले हे लिहायचे. त्याची बेरीज करून टक्केवारी काढायचे. नंबर द्यायचे. हो, हे सगळे उद्योग मी केले
आहेत. या तक्त्यात मी कधी पहिल्या दहात असायचे तर कधी नसायचे. पण म्हणून त्यापैकी
कोणासोबतही माझी मैत्री बिघडली नाही. आजही तितकीच तशीच चांगली आहे. हेच मला त्या
शाळेने शिकवलं. स्पर्धेत सहभागी व्हा. पण ती तेवढ्यापुरतं ठेवा. कधी हराल, कधी जिंकाल, कधी अधेमधे रहाल. पण त्याने
नुकसान होणार नाही.
मुलुंडच्या वझे केळकर
कॉलेजची बातच वेगळी. घरापासून लांब असलेल्या कॉलेजमध्ये जायचं म्हणजे थ्रील होतं
माझ्यासाठी. पाच वर्ष धमाल केली या कॉलेजमध्ये. स्टेज फिअर काय असतं ते
प्रत्यक्षात इथे अनुभवलं. तिथेच त्यावर मातही केली. अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला. कार्यक्रम आयोजित केले.
वेळोवेळी आलेली आव्हानं शिताफिने पेलली. अशा स्पर्धांमधूनच लोकांशी बोलायला शिकले, असंख्य लोक संपर्कात आले. ते आजही ओळखतात, बोलतात. मध्यभागी मैदान आणि त्याच्या चारही बाजूंनी पसरलेली
इमारत; असं आमचं कॉलेज. मैदानात
उभं राहून इमारतीकडे बघितलं की मनात येणारी भावना चेहऱ्यावर हसू आणल्याशिवाय राहत
नाही.
पत्रकारितेच्या शिक्षणासाठी
गाठलं ते झेविअर्स कॉलेजचं झेविअर इन्स्टिट्युट ऑफ कम्युनिकेशन. इथे सगळ्यात
महत्त्वाची आणि पुढे प्रचंड उपयोगी ठरलेली गोष्ट मी शिकले. आपल्या स्वभावाविरुद्ध
स्वभाव असलेल्या व्यक्तीशी जमवून घेणं. ते कॉलेज सोडून आता दहा वर्षं होतील. पण
आजही तिथे गेलं की त्या जागेमधला आपलेपणा जाणवतो. आम्हाला अनेक प्रोजेक्ट्स करावे लागे. त्यावेळी वेगवेगळ्या
विद्यार्थ्यांसोबत ते करावं लागे. अशावेळी एका गटात असलेल्या सगळ्या सदस्यांशी
जमायचंच असं अजिबात नव्हतं. खटके
उडायचेच. पण तेव्हा कळलेला एक मंत्र म्हणजे; न पटणारे लोक नोकरीच्या
ठिकाणीही असंख्य मिळतील. तेव्हा सतत नोकरी बदलण्याचा पर्याय नसणार. त्यांच्याशी
जमवून घ्यावंच लागेल. नोकरी टिकवावीच लागेल. नोकरीच्या ठिकाणी अशी न पटणारी
व्यक्ती समोर आली की तो मंत्र कायम आठवतो.
आपण शाळा, कॉलेजमध्ये बरंच काही
शिकतो. कधी शिक्षक तर कधी मित्रपरिवार शिकवतो. ती वास्तुसुद्धा आपल्याला काही
सांगू पाहत असते. या वास्तुंबद्दलच्या असंख्य आठवणी आपल्या मनात असतात. खरं तर
वास्तु म्हणजे निर्जीव गोष्ट; तरीसुद्धा ती जागा, तिथल्या वाईब्स
हव्याहव्याशा वाटतात. माझ्यासाठी मग ते झेविअर्समधलं कॅंटीन असो, नाईक विद्यालयातील मोठं झाड, केळकर कॉलेजमधली तालीम
करायची एसआरसीची जागा किंवा गजानन विद्यालयातील बेसमेंटसारखी प्रार्थना म्हणायची
जागा... हे आजही खूप स्पष्ट आठवतं. माझ्या बॅचमधल्या बऱ्याच जणांना कधी कधी असं वाटतं, ‘आपल्याला आपल्या शाळेने, कॉलेजने काय दिलं? काहीच नाही.’ मला मात्र नेहमी वाटतं; ते आपल्याला भरभरून देत
असतं. आपल्याला ते दिसलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा परिणाम हा आपल्या प्रगतीशी, विकासाशी, आर्थिक स्थैर्याशी कसा
ठरवता येईल? आणि तो का असावा? कधीतरी ती फक्त एक
शिकण्याची प्रक्रिया नसू शकते का? त्यामुळे माझं माझ्या
सगळ्या शाळांवर, कॉलेजांवर, नोकरी केलेल्या आणि करत
असलेल्या सगळ्या इमारतींवर आजही तितकंच प्रेम आहे आणि ते कायम राहील.
मी इथेच धडपडले, इथेच आपटले, इथेच हरले. इथेच जिंकलेही, इथेच शिकले, इथेच सावरले आणि इथेच
मोठीही झाले...
खऱ्या अर्थाने या इमारतींनी
माझी 'शाळा' घेतली !