‘मला माझ्या लहानपणी अमुक एक गोष्ट मिळाली नाही; पण मी माझ्या मुलाला सगळं देणार.’
‘मुलांवर ओरडू नये, चिडू नये असं एका अहवालात वाचलं. हल्ली खूप विचार करावा लागतो मुलांशी बोलताना, वागताना..’
‘एक तर आपल्याला मुलांबरोबर कमी वेळ मिळतो; त्यातही आपण त्यांना शिस्त लावायला जावं हे काही मला पटत नाही. ते म्हणतील तसं करत जावं’
‘हल्ली स्पर्धा किती आहे... त्यामुळे मुलांनी अभ्यासासह इतरही काही कलागुण आत्मसात करायला हवेत’
'तो तीन वर्षांचा आहे. सगळं खातो.. माझा मुलगा तसं कधी खाणार? खूप काळजी वाटते'
ही आणि अशा प्रकारची आणखी बरीच वाक्यं अनेक पालकांकडून ऐकायला मिळतात. पालकांचा हा वयोगट आहे साधारण २५ ते ३५ वर्षं यामधला. आपल्या पाल्याला चांगलं आयुष्य मिळावं असं प्रत्येक पालकाला वाटत असतं. ते त्याच्यासाठी जीवाचं रान करतात. मग ते वाढीव शुल्क भरून एखादी शिकवणी लावणं असो, एखाद्या कलेचा प्रशिक्षण वर्ग असो किंवा एखादी वस्तू खरेदी करून देणं असो... या सगळ्यात ‘पैसे दिले की झालं’ हा दृष्टिकोन प्रामुख्यानं समोर येतो. पण हे सगळं करताना पालकांच्या हातून अनेक गोष्टी सुटून जातात हे त्यांच्या लक्षात येत नाही. पाल्याची होणारी मानसिक, भावनिक वाढ, सभोवतालच्या गोष्टींबद्दलची समज, वागणूक, व्यक्त होण्याची पद्धत अशा अनेक गोष्टींचा विचार मागे पडतो. त्यातच हल्ली सगळीकडे स्पर्धा असल्यामुळे आपल्या पाल्याला अमुक एक गोष्ट येतेय का, अभ्यासात आपल्या पाल्यापेक्षा दुसरा मुलगा जास्त हुशार आहे, लोकांसमोर त्याची वागणूक व्यवस्थित असते... माझी मुलगी किंवा मुलगा असं कधी अशी बोलणार, शिकणार, अशा विचारांनी ही स्पर्धा निर्माण होते. पालकांमध्ये अप्रत्यक्षपणे आलेली ही स्पर्धा बऱ्याच गोष्टींवर परिणाम करते. त्यामुळे पालकांमध्ये पाल्याला सर्वार्थानं वाढवायचं कसं याविषयी प्रचंड गोंधळ उडतो.
काळानुरूप पालकत्वाचं स्वरूप बदलत गेलं. सभोवताल, प्रगत तंत्रज्ञान, शिक्षणपद्धती, सामाजिक माध्यमं अशा विविध कारणांनी आताच्या पालकत्वामध्ये बरेच बदल झाले आहेत. बदलत्या पालकत्वाबद्दल मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आशिष देशपांडे सांगतात, 'पूर्वी आपल्या समाजात प्रभुत्ववादी (Autocratic) पालकत्वाचा प्रभाव होता. आता हे स्वरूप बदलून स्वातंत्र्यवादी (liberal) किंवा अधिकारयुक्त (Authoritative) पालकत्वानं ती जागा घेतली आहे. स्वातंत्र्यवादी किंवा अधिकारयुक्त पद्धतीनं पाल्याला वाढवण्यासाठी पालकांनी त्यांच्याबरोबर वेळ घालवणं गरजेचं आहे. त्याशिवाय त्यांच्यात विश्वासार्ह नातं निर्माण होणार नाही. पण आजच्या पालकांकडे नोकरी-व्यवसायामुळे वेळ नाही. या बदललेल्या पालकत्वामध्ये मानसिक आरोग्याच्या अनेक समस्या दिसून येत आहेत.' मुलांना समजून घेऊन पालकत्व करणं महत्त्वाचं असल्याचं डॉ. देशपांडे आवर्जून नमूद करतात. 'मुलांना समजून घेण्यासाठी त्यांच्याबरोबर संवाद साधणं, वेळ घालवणं गरजेचं आहे. पाल्यांना समजून घेण्याचं कौशल्य व्यक्तिपरत्वे बदलत जातं. त्यामुळे प्रत्येकाची पालकत्वाची पद्धत वेगळी असते. त्यांच्या अनुभवावरून आणि पालकत्वावरील लेखनाचा आधार घेत ते त्यांच्या पालकत्वाची स्टाइल ठरवत असतात', असं ते सांगतात.
'आम्ही दोघं आयटी क्षेत्रातले आहोत. त्यामुळे आमच्या कामाच्या वेळा जास्त असतात. आमच्या चार वर्षांच्या मुलीबरोबर आम्हाला फार कमी वेळ मिळतो. म्हणून मिळालेला वेळ आनंदात कसा जाईल याकडे आम्ही लक्ष देतो. मग यात तिला काय हवं-नको ते प्रामुख्यानं बघितलं जातं', असं प्रितेश सांगत होता. प्रितेश आणि त्याच्या बायकोसारखी असंख्य जोडपी आपल्या आसपास असतात. पालकांना व्यग्र दिनक्रमामुळे मुलांसाठी कमी वेळ देता येतो. त्यामुळे त्यांच्या इच्छेनुसार काही पालक वागण्याचा प्रयत्न करतात. मग पाल्यांना हवं ते देण्यासाठी पालक तयार असतात. यातून मुलांना नकार ऐकण्याची सवय लागत नाही. याबद्दल चाइल्ड कौन्सिलर प्रतिमा भंडारकर सांगतात, 'मुलांबरोबर मिळालेला कमी वेळ चांगला जावा; तसंच त्या मुलांना आपली ओढ निर्माण व्हावी म्हणून पालक मुलं म्हणतील तसं वागतात. वाद टाळतात. पालक मुलांना कोणत्याही प्रकारचा नकार देत नाहीत. 'आपण मुलांसाठीच तर कमवतो' असं अनेक पालक म्हणतात. पण मुलांना प्रत्येक वेळी 'हो' म्हणायची गरज नसते. 'नाही', 'कदाचित', 'थोडा वेळ थांब' असं कधीतरी सांगत नकारही द्यायला हवा. त्यामुळे आयुष्यात ते नाही, नकार हे शब्द ऐकण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार होतील.'
पीअर प्रेशर ही संकल्पना आता केवळ शाळा, कॉलेजांपुरतं मर्यादित राहिली नसून, पालकांपर्यंत येऊन ठेपली आहे. 'मी नेहमी ठरवते इतर पालकांशी तुलना करायची नाही. प्रवाहानुसार पुढे जात मी माझ्या मुलीला वाढवणार. पण आजूबाजूला बघितलं की इतर पालक अनेक गोष्टी करताना दिसतात आणि नंतर मला त्याचं दडपण येऊ लागतं. पर्यायानं मी पुन्हा तुलना करू लागते', असं निशा सांगत होती. निशा ही दोन वर्षांच्या मुलीची मध्यमवर्गीय घरातील आई आहे. तिच्यासारख्या अनेक पालकांना हे पालकत्वासंबंधित पीअर प्रेशर येतं. याविषयी प्रतिमा भंडारकार सांगतात, 'पालक इंटरनेट, सोशल मीडिआ ग्रुप्स, मित्रपरिवार, नातेवाईक अशा वेगवेगळ्या माध्यमांतून पालकत्वावरील माहिती मिळवतात. पण कधी कधी त्यांनी त्यांचा आतला आवाज ऐकावा. त्यांचं मन त्यांना काय सांगतं यावर विश्वास ठेवावा. यावर त्यांनी जास्त अवलंबून राहायला हवं.' तर डॉ. आशिष देशपांडे म्हणतात, 'पीअर प्रेशर म्हणजे तुम्ही ज्या गटातले आहात त्या गटाचं प्रेशर. हे केवळ आता नाही तर पूर्वीही पालकांमध्ये होतं. या दडपणाखाली अनेक चुकीचे निर्णय घेतले जातात आणि त्याचे वाईट परिणाम होतात. एखाद्या पाल्याला आवड नसताना चित्रकला, नृत्य किंवा अन्य एखाद्या प्रशिक्षणाच्या वर्गाला घातलं जातं. अशा मुलांमधला आत्मविश्वास कमी होतो. त्यांचं खच्चीकरण होतं.'
स्पर्धा हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय यामध्ये येतो. पीअर प्रेशरमुळे ही स्पर्धा आणखी मोठी होत जाते. मूल वर्गात पहिलं आलं तर पालकांनाही ते पहिले आले असं वाटू लागतं. पाल्यही ती स्पर्धा जगू लागतं. मग दोन स्पर्धांमध्ये पहिलं आल्यानंतर तिसऱ्यात चांगलं सादरीकरण करू शकलं नाही तर पालकांच्या चेहऱ्यावरील निराशेचे भाव ते मूल बघतं आणि स्वत:ला अपराधी वाटून घेतं. याविषयी प्रतिमा सांगतात, 'तुमच्या पाल्याला यश मिळालं नाही तर त्याला समजून घ्या. अपयश मिळालं तरी प्रोत्साहन द्या. तुमच्या मुलांच्या क्षमता, आवड-निवड स्वीकारा.' काही मुलं अभ्यासात हुशार असतात, काही विविध कलांमध्ये पारंगत असतात; काहींना खेळाची आवड असते; तर काही व्यासपीठावर जाऊन बिनधास्त बोलू शकतात; हे पालकांनी लक्षात घ्यायला हवं.
पीअर प्रेशरप्रमाणे पालकांना आणखी एक दडपण असतं. ते म्हणजे लोक आपल्याला 'जज' करतील याचं. चारचौघात आपल्या पाल्याकडून एखादा चुकीचा शब्द उच्चारला गेला तर त्यावरून त्या आई-वडिलांच्या पालकत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाईल, असं त्या पालकांना वाटतं. हे दडपण मानसिक स्वास्थ्यावर परिणाम करतं. वास्तविक अशा प्रसंगांना पालकांनी निडरपणे सामोरं जायला हवं. पाल्याच्या यशाचं श्रेय पालकांना हवं असतं. त्याचप्रमाणे त्यांच्या अपयशाचाही ते भागीदार असतात, हे पालकांनी लक्षात ठेवायला हवं; असं तज्ज्ञ सांगतात. मूल झाल्यावर अनेक स्त्रिया नोकरी सोडून पूर्ण वेळ आई या भूमिकेत जातात. इंजिनीअर असलेल्या आणि दहा वर्षं नोकरी केलेल्या अंकिताचं तसंच झालं. मॅटर्निटी लीव्ह संपल्यानंतर ती नोकरीवर रुजू झाली. पण पाच-सहा महिन्यांतच मूल, घर आणि नोकरी यात होणारी तारांबळ तिच्या लक्षात आली. ती मानसिक, शारीरिकदृष्ट्या दमू लागली. शेवटी तिनं नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. अंकितासारख्या अनेक स्त्रिया कधी स्वेच्छेनं तर कधी नाइलाजानं हा निर्णय घेतात. पण त्यानंतर ज्या कारणासाठी पूर्ण वेळ घरी राहायचं ठरवलं, ती आईची जबाबदारीसुद्धा १०० टक्के निभावता येत नाहीय असं लक्षात आल्यावर त्यांच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण होते. या भावनेमुळे अशा स्त्रियांचं मानसिक स्वास्थ्य बिघडतं. पण हे होऊ द्यायचं नसेल तर त्यांनी पहिल्या पायरीवरच स्वतःला सावरायला हवं.
एकुणात, पालकांनी आधी स्वत:च गृहपाठ करणं महत्त्वाचं आहे. पालकत्वाविषयी माहिती वाचणं, अनुभवी लोकांचं म्हणणं ऐकणं, लोकांचे सल्ले घेणं हे सगळं करत असताना स्वत:ही विविध गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं आहे. अनेकदा पालक असं म्हणतात की, मला माझ्या लहानपणी जे मिळालं नाही, ते-ते मी सगळं माझ्या पाल्याला देणार. पण खरं तर पालकांना जे मिळालं, जे त्यांनी केलं तेही त्यांनी त्यांच्या मुलांना द्यायला हवं, त्यांच्या मुलांनी ते करायला हवं; म्हणजे मातीत खेळणं, पालकांचा ओरडा खाणं, बागेत मनसोक्त खेळणं, अभ्यासात मिळालेले कमी मार्क, मिळालेला नकार, मित्रपरिवाराशी झालेली भांडणं, पुन्हा झालेली गट्टी हे सगळं त्यांनीही अनुभवायला हवं. तसंच पालकांनीही अपराधीपणाची भावना, स्पर्धा, दडपण, अतिविचार अशा अनावश्यक गोष्टी टाळून सकारात्मक होणं गरजेचं आहे. तरच पालकांना पालकत्वाचा आनंद घेता येईल आणि पाल्यांना ते अनुभवण्याचा!!
स्पर्धा आणि अट्टहास :-
पालकांमधील गोंधळाची सुरुवात होते कशी... आताच्या पालकांची मानसिकता, सभोवतालची परिस्थिती आणि त्यांची विचारप्रणाली या गोष्टी प्रामुख्यानं त्यास कारणीभूत ठरतात. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आशिष देशपांडे याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे मांडतात. ते म्हणतात, ‘पालकांची आजची पिढी महत्त्वाकांक्षी आहे. त्यांना परदेशात राहायचा अनुभव आहे. १९८० ते २०१०-२०१५ या काळात परदेशगमन म्हणजे एखादी गोष्ट साध्य केल्याची पावती असायची. मग ते परदेशगमन लग्नासाठी केलेलं असो किंवा जीवनशैलीचं स्टेटस दाखवण्यासाठी केलेलं असो. हे सगळं विश्व अनुभवलेले सध्याचे पालक आहेत आणि ते भारतात आहेत. ते भारतात आहेत यामागची कारणं पटवून देण्याचा आजची पिढी प्रयत्न करतेय. कोणाचीही अपयश स्वीकारण्याची तयारी नाही. त्याऐवजी ‘आम्ही आमच्या इच्छेनेच भारतात राहतोय’ असं दाखवलं जातं. पण त्यांच्या या इच्छेत ते अमेरिकी जीवनशैली मिळवण्याचा, जगण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांच्यात स्पर्धा येते. अमेरिकेला मला जायला मिळालं नाही, मग ते माझ्या पाल्याला मिळावं असं पालकांना वाटतं. यातून इंग्रजी माध्यमाचा किंवा परदेशात होत असलेल्या एखाद्या कोर्सला घालण्याचा अट्टहास निर्माण होतो. त्यासाठी हवा तेवढा पैसा खर्च केला जातो. हल्ली पाल्यांना आंतरराष्ट्रीय शाळांमध्ये घालण्याचं प्रस्थ वाढलंय. यातून पालकांमधील महत्त्वाकांक्षेचा अंदाज येऊ शकतो. आपण मुलांना असं शिकवत असतो की, तुला हवं ते मिळवण्यासाठी तू काहीही करं. त्याला ध्येय किंवा जिद्द म्हणतात. जे मिळालंय ते हवंहवंसं वाटून घेणं हेही खूप महत्त्वाचं आहे. जे हवंय ते मिळवणं हे ध्येय असतं. पण जे मिळालंय ते हवंहवंसं वाटून घेणं हे आयुष्य असतं. पालकांनी हे स्वत: शिकणं आणि पाल्यांनाही शिकवणं खूप महत्त्वाचं आहे.'
अपराधीपणाची भावना :-
चाइल्ड कौन्सिलर प्रतिमा भंडारकर सांगतात, 'पालक पाल्यांचे हितचिंतक असतात; पण त्यांना मार्गदर्शनाची थोडी आवश्यकता असू शकते. साधारणत: २५-३५ या वयोगटातले पालक न्यू एज पॅरेंटिंगमध्ये येतात. या वयोगटातल्या पालकांसमोर असलेली आव्हानं, समस्या, अडचणी आधी समजून घ्यायला हव्यात. एक तर त्यांच्या करिअरची सुरुवात होत असते; नाही तर ते करिअरची शिडी चढत असतात. म्हणून ते अनेकदा पालकत्व आणि करिअरच्या जबाबदाऱ्या यामध्ये खेचले जातात. ते एकीकडे लक्ष केंद्रित करतात, तेव्हा त्यांचं दुसरीकडे दुर्लक्ष होतंय असं त्यांना वाटतं. यामुळे पालकांमध्ये अपराधीपणाची भावना निर्माण होते.'
पालकत्वाचे पंचतंत्र :-
पाल्यानं आनंदी, निरोगी आणि एक उत्तम माणूस व्हावं असं प्रत्येक पालकाला वाटतं. पण हे होण्यासाठी काय आणि कसं करावं याविषयी पाच महत्त्वपूर्ण गोष्टी पुढीलप्रमाणे. अपयशाचा सामना करण्यासाठी या गोष्टी मदत करतात.
- नातेसंबंध : पाल्यानं पालकांव्यतिरिक्त इतरांशीसुद्धा चांगले नातेसंबंध प्रस्थापित करायला हवेत. ते त्यांच्या अडचणींविषयी शिक्षक, नातेवाईक, मित्रपरिवार असं कोणाकडे तरी जाऊन बोलले पाहिजे. कारण मूल मोठं झाल्यानंतर शिक्षण, नोकरीमुळे पालकांपेक्षा त्यांचा इतर लोकांशी जास्त संपर्क येणार आहे. त्यांना कधीही एकटं वाटता कामा नये.
- हेल्दी कोपिंग स्ट्रॅटेजी : दैनंदिन आयुष्यातील छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायला हवा. उत्तम आहार, पुरेशी झोप, नियमित व्यायाम, मेडिटेशन, छंद जोपासणं, खेळणं या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. यासह घरात खेळीमेळीचं, प्रसन्न वातावरण असायला हवं.
- सकारात्मकता : पाल्यांच्या मनात आशा निर्माण करणं महत्त्वाचं आहे. त्यांना एखादी गोष्ट जमली नाही तरी त्यांना प्रोत्साहन द्या, त्यांची प्रशंसा करा. त्यांच्यात सकारात्मकता निर्माण करा.
- भावनिक जागरुकता : भावना वाईट नसतात; पण त्या व्यक्त करण्याची पद्धत चुकीची असू शकते. म्हणजे राग येणं वाईट नाही; पण आक्रमकता वाईट. पालक त्यांच्या भावना कशा व्यक्त करतात, हे महत्त्वाचं असतं. कारण मुलं त्यांना बघूनच शिकत असतात. भावना व्यक्त करण्यासह दुसऱ्यांच्या भावना नीट समजूनही घेता येणं गरजेचं आहे. हल्ली इमोशनल कोशंटलाही खूप महत्त्व दिलं जातं.
- स्कील्स फॉर इंडिपेंडंट लिव्हिंग : मुलांचे गृहपाठ त्यांनाच करू द्या. मुलं खेळून दमतात आणि झोपतात. गृहपाठ झाला नाही तर मुलांना ओरडा मिळेल म्हणून पालक गृहपाठ करतात. आमुळे गृहपाठ ही आपली जबाबदारी आहे आणि ती आपण पार पाडली नाही तर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात, हे त्यांना समजू शकत नाही. त्यामुळे मुलांना त्यांची काम स्वतः करू द्यावी.
- प्रतिमा भंडारकर, चाइल्ड कौन्सिलर
हे करून पाहा : -
पालकांनी नेमकं काय करायला हवं हे चाइल्ड कौन्सिलर प्रतिमा भंडारकर याविषयी काही धोरणं सांगितली आहेत.
- तुमचं पाल्य अप्रतिम, उत्कृष्ट आहे, ते जसं आहे तसं त्याला स्वीकारा. तुमच्या मुलांद्वारे तुमची स्वप्नं जगू नका. त्यांना त्याचं स्वतंत्र आयुष्य जगू द्या.
- मुलांच्या वागणुकीमागची कारणं, पार्श्वभूमी समजून घ्या. त्यांना काय होतंय हे त्यांना सांगता येत नाही, समजत नाही आणि मग ते विचित्र पद्धतीनं वागतात. त्यामुळे त्यांना ते असं का वागताहेत हे समजून घेण्यासाठी मदत करा.
- मुलांना ‘नाही’ ऐकण्याची सवय लावा. त्यामुळे आयुष्यात येणाऱ्या नकार, अपयशाला पचवण्याची ताकद त्यांच्यात निर्माण होईल.
- भावनिक शब्दभांडार उत्तम असणं गरजेचं आहे. भावना व्यक्त करण्यासाठी शब्दांचा वापर करा. घरात आई किंवा बाबा चिडले असतील तर मुलांना फक्त ते ‘दिसतं’. पण त्यांनी त्यांचा राग किंवा इतर भावना शब्दांद्वारे व्यक्त करायला हव्यात. ‘दमले आहे’ किंवा ‘कंटाळा आला आहे’ असं शब्दांत ऐकवायला हवेत. यातून मुलांना त्यांच्या भावना शब्दांमधून व्यक्त कशा करायच्या हे समजेल.
- तुमच्या पाल्याबरोबर तुमचा संवाद असायलाच हवा. हा संवाद हो किंवा नाही एवढ्यापुरता मर्यादित असता कामा नये. उदा: ‘डबा खाल्लास का?’ या प्रश्नावर मिळालेल्या फक्त हो किंवा नाही एवढ्या उत्तरावर थांबू नका. कोणाबरोबर खाल्लास, त्यानं काय आणलं होतं, वगैरे विचारा. त्यामुळे संवाद वाढत जाईल आणि हा संवाद करताना पालकांनी ऐकून घेण्याची तयारी ठेवायला हवी. कारण काही पाल्यांना अचानक एका क्षणी पूर्ण दिवसात काय काय झालं हे आठवतं आणि ते सांगायला सुरुवात करतात. त्यामुळे त्याचं बोलणं ऐकून घ्यायची तयारी ठेवायला हवी.
- पालकांनी स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्यायला हवी. तुम्ही स्वतःला कसं शांत ठेवता, लोकांशी कसं बोलता, तुमची विविध विषयांवरची मतं-भूमिका काय आहेत हे सगळं महत्त्वाचं ठरतं. तुमची मुलं तुम्हाला हे सगळं करताना बघत असतात. तुम्ही त्यांना सांगितलेलं ते ऐकून घेतात; पण ते जे बघतात तेच करतात. तुम्ही स्वतःसाठी वेळ द्या. अपराधीपणाची भावना मनात बाळगू नका. पालकांनी एकमेकांनाही वेळ द्या. एकमेकांच्या निर्णयांमध्ये साथ द्या.
(सर्व चित्रं : रोहन पोरे)