Sunday, October 30, 2022

पालकत्वाची परीक्षा


‘मला माझ्या लहानपणी अमुक एक गोष्ट मिळाली नाही; पण मी माझ्या मुलाला सगळं देणार.’

‘मुलांवर ओरडू नये, चिडू नये असं एका अहवालात वाचलं. हल्ली खूप विचार करावा लागतो मुलांशी बोलताना, वागताना..’

‘एक तर आपल्याला मुलांबरोबर कमी वेळ मिळतो; त्यातही आपण त्यांना शिस्त लावायला जावं हे काही मला पटत नाही. ते म्हणतील तसं करत जावं’

‘हल्ली स्पर्धा किती आहे... त्यामुळे मुलांनी अभ्यासासह इतरही काही कलागुण आत्मसात करायला हवेत’

'तो तीन वर्षांचा आहे. सगळं खातो.. माझा मुलगा तसं कधी खाणार? खूप काळजी वाटते'

ही आणि अशा प्रकारची आणखी बरीच वाक्यं अनेक पालकांकडून ऐकायला मिळतात. पालकांचा हा वयोगट आहे साधारण २५ ते ३५ वर्षं यामधला. आपल्या पाल्याला चांगलं आयुष्य मिळावं असं प्रत्येक पालकाला वाटत असतं. ते त्याच्यासाठी जीवाचं रान करतात. मग ते वाढीव शुल्क भरून एखादी शिकवणी लावणं असो, एखाद्या कलेचा प्रशिक्षण वर्ग असो किंवा एखादी वस्तू खरेदी करून देणं असो... या सगळ्यात ‘पैसे दिले की झालं’ हा दृष्टिकोन प्रामुख्यानं समोर येतो. पण हे सगळं करताना पालकांच्या हातून अनेक गोष्टी सुटून जातात हे त्यांच्या लक्षात येत नाही. पाल्याची होणारी मानसिक, भावनिक वाढ, सभोवतालच्या गोष्टींबद्दलची समज, वागणूक, व्यक्त होण्याची पद्धत अशा अनेक गोष्टींचा विचार मागे पडतो. त्यातच हल्ली सगळीकडे स्पर्धा असल्यामुळे आपल्या पाल्याला अमुक एक गोष्ट येतेय का, अभ्यासात आपल्या पाल्यापेक्षा दुसरा मुलगा जास्त हुशार आहे, लोकांसमोर त्याची वागणूक व्यवस्थित असते... माझी मुलगी किंवा मुलगा असं कधी अशी बोलणार, शिकणार, अशा विचारांनी ही स्पर्धा निर्माण होते. पालकांमध्ये अप्रत्यक्षपणे आलेली ही स्पर्धा बऱ्याच गोष्टींवर परिणाम करते. त्यामुळे पालकांमध्ये पाल्याला सर्वार्थानं वाढवायचं कसं याविषयी प्रचंड गोंधळ उडतो.

हल्लीचे पालक पाल्यांचं शिक्षण, त्यांची जडणघडण, करिअरची स्वप्नं असा सगळ्या बाबतीत सजग आहेत हे सकारात्मकदृष्ट्या म्हणतानाच, पाल्यासाठी नेमकं काय, कसं आणि का बरोबर आहे हे समजून घेण्यात ते काही वेळा थोडेसे डगमगतात हेही मान्य करावं लागेल. 'मुलांना ओरडू नये, त्यांच्यावर परिणाम होतो', 'त्यांच्या कलेनं घ्यावं', 'आपली वागणूक, भाषा पाल्यासमोर नीट हवी' अशा एक ना अनेक गोष्टी डोक्यात ठेवून पालक 'आदर्श' व्हायला जातात. पण इतक्या चौकटीत वागणं, बोलणं पालकांना सातत्यानं जमतंच असं नाही. मग काही पालक 'प्रवाहाप्रमाणे चालू या, वागू या' असं ठरवतात. पण तसं केल्यानं आपण पालकत्वात अधिक सैल होतोय का अशी शंका त्यांच्या मनात उपस्थित होते आणि मग ते पुन्हा मूळ पदावर येतात; म्हणजे अति सजग, जागरुक असण्याच्या पायरीवर. यामागे पालकांचा चांगलाच हेतू असतो. आपल्या पाल्याचं सगळं उत्तम व्हावं असंच त्यांना वाटतं. पण आजुबाजूची सामाजिक परिस्थिती, वाचलेली माहिती, मित्रपरिवार-नातेवाईकांनी दिलेले सल्ले या सगळ्यामुळे उडालेला गोंधळ मनात ठेवून आजचे पालक पालकत्वाचे धडे गिरवत आहेत.

काळानुरूप पालकत्वाचं स्वरूप बदलत गेलं. सभोवताल, प्रगत तंत्रज्ञान, शिक्षणपद्धती, सामाजिक माध्यमं अशा विविध कारणांनी आताच्या पालकत्वामध्ये बरेच बदल झाले आहेत. बदलत्या पालकत्वाबद्दल मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आशिष देशपांडे सांगतात, 'पूर्वी आपल्या समाजात प्रभुत्ववादी (Autocratic) पालकत्वाचा प्रभाव होता. आता हे स्वरूप बदलून स्वातंत्र्यवादी (liberal) किंवा अधिकारयुक्त (Authoritative) पालकत्वानं ती जागा घेतली आहे. स्वातंत्र्यवादी किंवा अधिकारयुक्त पद्धतीनं पाल्याला वाढवण्यासाठी पालकांनी त्यांच्याबरोबर वेळ घालवणं गरजेचं आहे. त्याशिवाय त्यांच्यात विश्वासार्ह नातं निर्माण होणार नाही. पण आजच्या पालकांकडे नोकरी-व्यवसायामुळे वेळ नाही. या बदललेल्या पालकत्वामध्ये मानसिक आरोग्याच्या अनेक समस्या दिसून येत आहेत.' मुलांना समजून घेऊन पालकत्व करणं महत्त्वाचं असल्याचं डॉ. देशपांडे आवर्जून नमूद करतात. 'मुलांना समजून घेण्यासाठी त्यांच्याबरोबर संवाद साधणं, वेळ घालवणं गरजेचं आहे. पाल्यांना समजून घेण्याचं कौशल्य व्यक्तिपरत्वे बदलत जातं. त्यामुळे प्रत्येकाची पालकत्वाची पद्धत वेगळी असते. त्यांच्या अनुभवावरून आणि पालकत्वावरील लेखनाचा आधार घेत ते त्यांच्या पालकत्वाची स्टाइल ठरवत असतात', असं ते सांगतात.  

'आम्ही दोघं आयटी क्षेत्रातले आहोत. त्यामुळे आमच्या कामाच्या वेळा जास्त असतात. आमच्या चार वर्षांच्या मुलीबरोबर आम्हाला फार कमी वेळ मिळतो. म्हणून मिळालेला वेळ आनंदात कसा जाईल याकडे आम्ही लक्ष देतो. मग यात तिला काय हवं-नको ते प्रामुख्यानं बघितलं जातं', असं प्रितेश सांगत होता. प्रितेश आणि त्याच्या बायकोसारखी असंख्य जोडपी आपल्या आसपास असतात. पालकांना व्यग्र दिनक्रमामुळे मुलांसाठी कमी वेळ देता येतो. त्यामुळे त्यांच्या इच्छेनुसार काही पालक वागण्याचा प्रयत्न करतात. मग पाल्यांना हवं ते देण्यासाठी पालक तयार असतात. यातून मुलांना नकार ऐकण्याची सवय लागत नाही. याबद्दल चाइल्ड कौन्सिलर प्रतिमा भंडारकर सांगतात, 'मुलांबरोबर मिळालेला कमी वेळ चांगला जावा; तसंच त्या मुलांना आपली ओढ निर्माण व्हावी म्हणून पालक मुलं म्हणतील तसं वागतात. वाद टाळतात. पालक मुलांना कोणत्याही प्रकारचा नकार देत नाहीत. 'आपण मुलांसाठीच तर कमवतो' असं अनेक पालक म्हणतात. पण मुलांना प्रत्येक वेळी 'हो' म्हणायची गरज नसते. 'नाही', 'कदाचित', 'थोडा वेळ थांब' असं कधीतरी सांगत नकारही द्यायला हवा. त्यामुळे आयुष्यात ते नाही, नकार हे शब्द ऐकण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार होतील.'

पीअर प्रेशर ही संकल्पना आता केवळ शाळा, कॉलेजांपुरतं मर्यादित राहिली नसून, पालकांपर्यंत येऊन ठेपली आहे. 'मी नेहमी ठरवते इतर पालकांशी तुलना करायची नाही. प्रवाहानुसार पुढे जात मी माझ्या मुलीला वाढवणार. पण आजूबाजूला बघितलं की इतर पालक अनेक गोष्टी करताना दिसतात आणि नंतर मला त्याचं दडपण येऊ लागतं. पर्यायानं मी पुन्हा तुलना करू लागते', असं निशा सांगत होती. निशा ही दोन वर्षांच्या मुलीची मध्यमवर्गीय घरातील आई आहे. तिच्यासारख्या अनेक पालकांना हे पालकत्वासंबंधित पीअर प्रेशर येतं. याविषयी प्रतिमा भंडारकार सांगतात, 'पालक इंटरनेट, सोशल मीडिआ ग्रुप्स, मित्रपरिवार, नातेवाईक अशा वेगवेगळ्या माध्यमांतून पालकत्वावरील माहिती मिळवतात. पण कधी कधी त्यांनी त्यांचा आतला आवाज ऐकावा. त्यांचं मन त्यांना काय सांगतं यावर विश्वास ठेवावा. यावर त्यांनी जास्त अवलंबून राहायला हवं.' तर डॉ. आशिष देशपांडे म्हणतात, 'पीअर प्रेशर म्हणजे तुम्ही ज्या गटातले आहात त्या गटाचं प्रेशर. हे केवळ आता नाही तर पूर्वीही पालकांमध्ये होतं. या दडपणाखाली अनेक चुकीचे निर्णय घेतले जातात आणि त्याचे वाईट परिणाम होतात. एखाद्या पाल्याला आवड नसताना चित्रकला, नृत्य किंवा अन्य एखाद्या प्रशिक्षणाच्या वर्गाला घातलं जातं. अशा मुलांमधला आत्मविश्वास कमी होतो. त्यांचं खच्चीकरण होतं.'

स्पर्धा हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय यामध्ये येतो. पीअर प्रेशरमुळे ही स्पर्धा आणखी मोठी होत जाते. मूल वर्गात पहिलं आलं तर पालकांनाही ते पहिले आले असं वाटू लागतं. पाल्यही ती स्पर्धा जगू लागतं. मग दोन स्पर्धांमध्ये पहिलं आल्यानंतर तिसऱ्यात चांगलं सादरीकरण करू शकलं नाही तर पालकांच्या चेहऱ्यावरील निराशेचे भाव ते मूल बघतं आणि स्वत:ला अपराधी वाटून घेतं. याविषयी प्रतिमा सांगतात, 'तुमच्या पाल्याला यश मिळालं नाही तर त्याला समजून घ्या. अपयश मिळालं तरी प्रोत्साहन द्या. तुमच्या मुलांच्या क्षमता, आवड-निवड स्वीकारा.' काही मुलं अभ्यासात हुशार असतात, काही विविध कलांमध्ये पारंगत असतात; काहींना खेळाची आवड असते; तर काही व्यासपीठावर जाऊन बिनधास्त बोलू शकतात; हे पालकांनी लक्षात घ्यायला हवं.

पीअर प्रेशरप्रमाणे पालकांना आणखी एक दडपण असतं. ते म्हणजे लोक आपल्याला 'जज' करतील याचं. चारचौघात आपल्या पाल्याकडून एखादा चुकीचा शब्द उच्चारला गेला तर त्यावरून त्या आई-वडिलांच्या पालकत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाईल, असं त्या पालकांना वाटतं. हे दडपण मानसिक स्वास्थ्यावर परिणाम करतं. वास्तविक अशा प्रसंगांना पालकांनी निडरपणे सामोरं जायला हवं. पाल्याच्या यशाचं श्रेय पालकांना हवं असतं. त्याचप्रमाणे त्यांच्या अपयशाचाही ते भागीदार असतात, हे पालकांनी लक्षात ठेवायला हवं; असं तज्ज्ञ सांगतात. मूल झाल्यावर अनेक स्त्रिया नोकरी सोडून पूर्ण वेळ आई या भूमिकेत जातात. इंजिनीअर असलेल्या आणि दहा वर्षं नोकरी केलेल्या अंकिताचं तसंच झालं. मॅटर्निटी लीव्ह संपल्यानंतर ती नोकरीवर रुजू झाली. पण पाच-सहा महिन्यांतच मूल, घर आणि नोकरी यात होणारी तारांबळ तिच्या लक्षात आली. ती मानसिक, शारीरिकदृष्ट्या दमू लागली. शेवटी तिनं नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. अंकितासारख्या अनेक स्त्रिया कधी स्वेच्छेनं तर कधी नाइलाजानं हा निर्णय घेतात. पण त्यानंतर ज्या कारणासाठी पूर्ण वेळ घरी राहायचं ठरवलं, ती आईची जबाबदारीसुद्धा १०० टक्के निभावता येत नाहीय असं लक्षात आल्यावर त्यांच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण होते. या भावनेमुळे अशा स्त्रियांचं मानसिक स्वास्थ्य बिघडतं. पण हे होऊ द्यायचं नसेल तर त्यांनी पहिल्या पायरीवरच स्वतःला सावरायला हवं.

एकुणात, पालकांनी आधी स्वत:च गृहपाठ करणं महत्त्वाचं आहे. पालकत्वाविषयी माहिती वाचणं, अनुभवी लोकांचं म्हणणं ऐकणं, लोकांचे सल्ले घेणं हे सगळं करत असताना स्वत:ही विविध गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं आहे. अनेकदा पालक असं म्हणतात की, मला माझ्या लहानपणी जे मिळालं नाही, ते-ते मी सगळं माझ्या पाल्याला देणार. पण खरं तर पालकांना जे मिळालं, जे त्यांनी केलं तेही त्यांनी त्यांच्या मुलांना द्यायला हवं, त्यांच्या मुलांनी ते करायला हवं; म्हणजे मातीत खेळणं, पालकांचा ओरडा खाणं, बागेत मनसोक्त खेळणं, अभ्यासात मिळालेले कमी मार्क, मिळालेला नकार, मित्रपरिवाराशी झालेली भांडणं, पुन्हा झालेली गट्टी हे सगळं त्यांनीही अनुभवायला हवं. तसंच पालकांनीही अपराधीपणाची भावना, स्पर्धा, दडपण, अतिविचार अशा अनावश्यक गोष्टी टाळून सकारात्मक होणं गरजेचं आहे. तरच पालकांना पालकत्वाचा आनंद घेता येईल आणि पाल्यांना ते अनुभवण्याचा!!

स्पर्धा आणि अट्टहास :-

पालकांमधील गोंधळाची सुरुवात होते कशी... आताच्या पालकांची मानसिकता, सभोवतालची परिस्थिती आणि त्यांची विचारप्रणाली या गोष्टी प्रामुख्यानं त्यास कारणीभूत ठरतात. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आशिष देशपांडे याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे मांडतात. ते म्हणतात, ‘पालकांची आजची पिढी महत्त्वाकांक्षी आहे. त्यांना परदेशात राहायचा अनुभव आहे. १९८० ते २०१०-२०१५ या काळात परदेशगमन म्हणजे एखादी गोष्ट साध्य केल्याची पावती असायची. मग ते परदेशगमन लग्नासाठी केलेलं असो किंवा जीवनशैलीचं स्टेटस दाखवण्यासाठी केलेलं असो. हे सगळं विश्व अनुभवलेले सध्याचे पालक आहेत आणि ते भारतात आहेत. ते भारतात आहेत यामागची कारणं पटवून देण्याचा आजची पिढी प्रयत्न करतेय. कोणाचीही अपयश स्वीकारण्याची तयारी नाही. त्याऐवजी ‘आम्ही आमच्या इच्छेनेच भारतात राहतोय’ असं दाखवलं जातं. पण त्यांच्या या इच्छेत ते अमेरिकी जीवनशैली मिळवण्याचा, जगण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांच्यात स्पर्धा येते. अमेरिकेला मला जायला मिळालं नाही, मग ते माझ्या पाल्याला मिळावं असं पालकांना वाटतं. यातून इंग्रजी माध्यमाचा किंवा परदेशात होत असलेल्या एखाद्या कोर्सला घालण्याचा अट्टहास निर्माण होतो. त्यासाठी हवा तेवढा पैसा खर्च केला जातो. हल्ली पाल्यांना आंतरराष्ट्रीय शाळांमध्ये घालण्याचं प्रस्थ वाढलंय. यातून पालकांमधील महत्त्वाकांक्षेचा अंदाज येऊ शकतो. आपण मुलांना असं शिकवत असतो की, तुला हवं ते मिळवण्यासाठी तू काहीही करं. त्याला ध्येय किंवा जिद्द म्हणतात. जे मिळालंय ते हवंहवंसं वाटून घेणं हेही खूप महत्त्वाचं आहे. जे हवंय ते मिळवणं हे ध्येय असतं. पण जे मिळालंय ते हवंहवंसं वाटून घेणं हे आयुष्य असतं. पालकांनी हे स्वत: शिकणं आणि पाल्यांनाही शिकवणं खूप महत्त्वाचं आहे.'

अपराधीपणाची भावना :- 

चाइल्ड कौन्सिलर प्रतिमा भंडारकर सांगतात, 'पालक पाल्यांचे हितचिंतक असतात; पण त्यांना मार्गदर्शनाची थोडी आवश्यकता असू शकते. साधारणत: २५-३५ या वयोगटातले पालक न्यू एज पॅरेंटिंगमध्ये येतात. या वयोगटातल्या पालकांसमोर असलेली आव्हानं, समस्या, अडचणी आधी समजून घ्यायला हव्यात. एक तर त्यांच्या करिअरची सुरुवात होत असते; नाही तर ते करिअरची शिडी चढत असतात. म्हणून ते अनेकदा पालकत्व आणि करिअरच्या जबाबदाऱ्या यामध्ये खेचले जातात. ते एकीकडे लक्ष केंद्रित करतात, तेव्हा त्यांचं दुसरीकडे दुर्लक्ष होतंय असं त्यांना वाटतं. यामुळे पालकांमध्ये अपराधीपणाची भावना निर्माण होते.'

पालकत्वाचे पंचतंत्र  :- 

पाल्यानं आनंदी, निरोगी आणि एक उत्तम माणूस व्हावं असं प्रत्येक पालकाला वाटतं. पण हे होण्यासाठी काय आणि कसं करावं याविषयी पाच महत्त्वपूर्ण गोष्टी पुढीलप्रमाणे. अपयशाचा सामना करण्यासाठी या गोष्टी मदत करतात. 

  • नातेसंबंध : पाल्यानं पालकांव्यतिरिक्त इतरांशीसुद्धा चांगले नातेसंबंध प्रस्थापित करायला हवेत. ते त्यांच्या अडचणींविषयी शिक्षक, नातेवाईक, मित्रपरिवार असं कोणाकडे तरी जाऊन बोलले पाहिजे. कारण मूल मोठं झाल्यानंतर शिक्षण, नोकरीमुळे पालकांपेक्षा त्यांचा इतर लोकांशी जास्त संपर्क येणार आहे. त्यांना कधीही एकटं वाटता कामा नये.
  • हेल्दी कोपिंग स्ट्रॅटेजी : दैनंदिन आयुष्यातील छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायला हवा. उत्तम आहार, पुरेशी झोप, नियमित व्यायाम, मेडिटेशन, छंद जोपासणं, खेळणं या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. यासह घरात खेळीमेळीचं, प्रसन्न वातावरण असायला हवं.
  • सकारात्मकता : पाल्यांच्या मनात आशा निर्माण करणं महत्त्वाचं आहे. त्यांना एखादी गोष्ट जमली नाही तरी त्यांना प्रोत्साहन द्या, त्यांची प्रशंसा करा. त्यांच्यात सकारात्मकता निर्माण करा.
  • भावनिक जागरुकता : भावना वाईट नसतात; पण त्या व्यक्त करण्याची पद्धत चुकीची असू शकते. म्हणजे राग येणं वाईट नाही; पण आक्रमकता वाईट. पालक त्यांच्या भावना कशा व्यक्त करतात, हे महत्त्वाचं असतं. कारण मुलं त्यांना बघूनच शिकत असतात. भावना व्यक्त करण्यासह दुसऱ्यांच्या भावना नीट समजूनही घेता येणं गरजेचं आहे. हल्ली इमोशनल कोशंटलाही खूप महत्त्व दिलं जातं.
  • स्कील्स फॉर इंडिपेंडंट लिव्हिंग : मुलांचे गृहपाठ त्यांनाच करू द्या. मुलं खेळून दमतात आणि झोपतात. गृहपाठ झाला नाही तर मुलांना ओरडा मिळेल म्हणून पालक गृहपाठ करतात. आमुळे गृहपाठ ही आपली जबाबदारी आहे आणि ती आपण पार पाडली नाही तर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात, हे त्यांना समजू शकत नाही. त्यामुळे मुलांना त्यांची काम स्वतः करू द्यावी.

        - प्रतिमा भंडारकर, चाइल्ड कौन्सिलर

हे करून पाहा : - 

पालकांनी नेमकं काय करायला हवं हे चाइल्ड कौन्सिलर प्रतिमा भंडारकर याविषयी काही धोरणं सांगितली आहेत.

  • तुमचं पाल्य अप्रतिम, उत्कृष्ट आहे, ते जसं आहे तसं त्याला स्वीकारा. तुमच्या मुलांद्वारे तुमची स्वप्नं जगू नका. त्यांना त्याचं स्वतंत्र आयुष्य जगू द्या.
  • मुलांच्या वागणुकीमागची कारणं, पार्श्वभूमी समजून घ्या. त्यांना काय होतंय हे त्यांना सांगता येत नाही, समजत नाही आणि मग ते विचित्र पद्धतीनं वागतात. त्यामुळे त्यांना ते असं का वागताहेत हे समजून घेण्यासाठी मदत करा.
  • मुलांना ‘नाही’ ऐकण्याची सवय लावा. त्यामुळे आयुष्यात येणाऱ्या नकार, अपयशाला पचवण्याची ताकद त्यांच्यात निर्माण होईल.
  • भावनिक शब्दभांडार उत्तम असणं गरजेचं आहे. भावना व्यक्त करण्यासाठी शब्दांचा वापर करा. घरात आई किंवा बाबा चिडले असतील तर मुलांना फक्त ते ‘दिसतं’. पण त्यांनी त्यांचा राग किंवा इतर भावना शब्दांद्वारे व्यक्त करायला हव्यात. ‘दमले आहे’ किंवा ‘कंटाळा आला आहे’ असं शब्दांत ऐकवायला हवेत. यातून मुलांना त्यांच्या भावना शब्दांमधून व्यक्त कशा करायच्या हे समजेल.
  • तुमच्या पाल्याबरोबर तुमचा संवाद असायलाच हवा. हा संवाद हो किंवा नाही एवढ्यापुरता मर्यादित असता कामा नये. उदा: ‘डबा खाल्लास का?’ या प्रश्नावर मिळालेल्या फक्त हो किंवा नाही एवढ्या उत्तरावर थांबू नका. कोणाबरोबर खाल्लास, त्यानं काय आणलं होतं, वगैरे विचारा. त्यामुळे संवाद वाढत जाईल आणि हा संवाद करताना पालकांनी ऐकून घेण्याची तयारी ठेवायला हवी. कारण काही पाल्यांना अचानक एका क्षणी पूर्ण दिवसात काय काय झालं हे आठवतं आणि ते सांगायला सुरुवात करतात. त्यामुळे त्याचं बोलणं ऐकून घ्यायची तयारी ठेवायला हवी.
  • पालकांनी स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्यायला हवी. तुम्ही स्वतःला कसं शांत ठेवता, लोकांशी कसं बोलता, तुमची विविध विषयांवरची मतं-भूमिका काय आहेत हे सगळं महत्त्वाचं ठरतं. तुमची मुलं तुम्हाला हे सगळं करताना बघत असतात. तुम्ही त्यांना सांगितलेलं ते ऐकून घेतात; पण ते जे बघतात तेच करतात. तुम्ही स्वतःसाठी वेळ द्या. अपराधीपणाची भावना मनात बाळगू नका. पालकांनी एकमेकांनाही वेळ द्या. एकमेकांच्या निर्णयांमध्ये साथ द्या. 


(सर्व चित्रं : रोहन पोरे)




Thursday, January 6, 2022

कामात काम......


काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र टाइम्समध्ये स्मिता कुलकर्णी यांचा 'कामे कामे कामे गं' हा लेख वाचला. हा लेख वाचला आणि आजूबाजूला, ओळखीपाळखीच्या काही स्त्रियांचे काही अनुभव, त्यांनी सांगितलेले किस्से आठवले. तसंच आपणही साधारण काय विचार करतोय हे लक्षात आलं. 'मला सर्व कामे जमलीच पाहिजे, लोक काय म्हणतील, कुटुंबीय काय म्हणतील, अशा प्रकारचे विचार करून गृहिणींमध्ये 'सामाजिक चिंता' वाढीस लागते. या विचारसरणीमुळे आज ७० टक्क्यांपेक्षा जास्त गृहिणी मानसिक अनारोग्याच्या विळख्यात सापडल्या आहेत'; असं लेखाच्या सुरुवातीलाच म्हटलं आहे. लेखात नैराश्य, अस्वस्थता, आजार अशा महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केलं आहे. पण मला वाटतं इथवर गोष्टी जाऊच द्यायच्या नसतील तर त्यासाठी स्त्रियांनीच प्रयत्न करायला हवा. 

अनेक स्त्रियांना कामात कामं करायची आणि एकमागे एक अशी सलग कामं करायची सवय असते. मल्टिटास्किंग करण्यात स्त्रिया माहीर असतात असं म्हटलं जातं. पण हे मल्टिटास्किंग करण्याचं ओझं, दडपण अनेकदा स्त्रियाच नकळतपणे स्वत:वर लादून घेतात. घरातली रोजची त्यांच्या वाटणीची कामं म्हणजे खरं तर बरीचशी कामं झालीच पाहिजेत हे दडपण घेऊन वावरतात. घरी-दारी अमुक-तमुक कामांचा विचार करत सतत त्यातच गुरफटलेल्या असतात. मग या कामांच्या ओझ्याखाली दबून गेलेल्या त्यांच्या पदरी काय येतो तर; थकवा.... शारीरिक, मानसिक आणि भावनिक थकवा ! 

कामांची यादी कुठे लहान असते; ती तर मोठीच असते. पण ती रोजच्या रोज अपेक्षेप्रमाणे पूर्ण झालीच पाहिजे असा कुठे नियम आहे का? रोजच्या दहा कामांमध्ये काही कामं राहिली तरी काही बिघडत नाही. काही कामं ठरवून नाही केलीत तरीही फरक पडत नाही. त्या वेळेत ठरवून आराम केला तरी हरकत नाही. कारण आराम करणं, शरीराला, मनाला, भावनांना शांत ठेवणं हा हक्क आहे प्रत्येक स्त्रीचा. इतर कोणी याबाबत विचार करो अथवा न करो; तिनेच सगळ्यात आधी तिचा विचार करायला हवा. 

अनेक गृहिणी आठवड्यातील ठरावीक दिवशी, नोकरदार स्त्रिया त्यांच्या सुट्टीच्या दिवशी घरातली साफसफाई करतात. खरं तर ही जबाबदारी फक्त तिची नाही ना. पण ती जबाबदारी फक्त तिचीच आहे असं तिनेच तिच्या मनाशी पक्क केलं असतं. नाही केली एखाद्या आठवड्यात साफसफाई म्हणून कोणी तिला गुन्हेगार समजणार नाहीय आणि केली म्हणून पुरस्कारही देणार नाहीय. पण काय ना आपल्याकडे लहानपणापासून गोष्टी इतक्या खोलवर रुजवल्या जातात की ते मुळासकट उपटून काढण्यासाठी बरेच कष्ट करावे लागतात. इतके की अख्ख्या एका पिढीचा काळ त्यात लोटला जाईल.

अनेकांना हा विषय कदाचित खूप क्षुल्लक वाटेल. इतकं काय त्यात, सगळेच करतात की,... आता तर घरकामासाठी बायकाही असतात मग याचा इतका बाऊ का करायचा असंही म्हणतील. पण....  घरकाम करण्यासाठी मदतनीस बायका असल्या तरी गोष्टी मॉनिटर करण्यासाठी तिलाच त्यात डोकवावं लागतं. त्या आल्या नाहीत तर बहुतांश वेळा तिलाच उभं राहावं लागतं. कशाकशात तिने डोकं गुंतवून ठेवावं? 'मटा'तल्या त्या लेखातलं एक वाक्य अगदी पटलं. 'आपण माणूस म्हणून जगायचं की मशीन म्हणून याचा विचार करणं महत्त्वाचं आहे.' तिने 'नाही' म्हणायला शिकलं पाहिजे. इतरांना नाही म्हणणं तर दूरच; सर्वात आधी तिने तिलाच ठणकावून सांगायला हवं की, 'तुला झेपत नाहीय... तू हे करायचं नाही'. मग ती गृहिणी असो किंवा नोकरदार स्त्री... 

सगळ्याच घरात फक्त स्त्रियांनाच प्रचंड काम असतं असं नाही. काही पुरुषही तोडीस तोड काम करतात हे मान्यच आहे. हे सुखावणारं चित्र अनेक घरात बघायलाही मिळतं. पण अशा वेळी स्त्रियांना 'भाग्यवान आहेस हो' असं म्हटलं जातं. असं का.... एका लघुपटात हा विषय मांडला होता. त्यात नायिका नायकाला म्हणते तो संवाद खूप भारी वाटला होता मला.. 'वी आर नॉट लकी.... वी आर थँकफुल टू यू'... 

माझ्या पिढीतल्याच अनेक स्त्रिया या सगळ्याला सामोऱ्या जात असतात. कामांच्या ओझ्याखाली दबून जातात. सगळी कामं व्हायलाच हवीत हा अट्टहास त्यांच्यात आत खोलवर असतोच असतो.  पण याचा मानसिक, शारीरिक पातळीवर गंभीर परिणाम होऊ शकतात असं विज्ञानच सांगतं. आम्ही नाही का केली कामं, संसार, नोकरी असं आधीच्या पिढीचं म्हणणं असतं. पण काळानुसार जीवनशैली बदलते आणि जीवनशैली बदलली की इतर सर्व बाबींवरही परिणाम होतो आणि कमी-अधिक प्रमाणात तो होत राहणार हे आपण कधी मान्य करणार? दोन पिढ्यांमध्ये फरक असणारच. आमची पिढी जेवढी, जसं करते तेवढं आणि तसंच पुढची पिढी करेलच याची खात्री नाही. चक्र आहे हे.... स्वीकारायचं का आता तरी?  

या सगळ्यात तिनेच ठाम भूमिका घ्यायला हवी. स्वतःचं मानसिक, शारीरिक, भावनिक आरोग्य उत्तम ठेवायचं असेल तर तिने बोलायला हवं. स्वतःला समजवायला हवं.

कधीतरी तिने स्वत:ला सांगायला हवं... 

परफेक्ट नसलीस तरी ठिके... ठेव एखादं काम बाजूला आणि जा फिरायला.. मनसोक्त गाणी ऐक, पुस्तक वाच, गप्पा मार...एखाद्या दिवशी सगळे गजर बंद करून जाग येईल तेव्हा उठ... होऊ दे उशीर सगळ्या कामांना.. हरकत नाही... आणि सगळ्यात महत्त्वाचं... 

तिने स्वत:ला दिवसातून फक्त एकदा म्हटलं पाहिजे.... तू कमाल आहेस.. एक नंबर आहेस....! 



Friday, April 23, 2021

स्पर्श...


कठीण परिस्थिती आपल्याला बरंच काही देऊन जाते. कधी कधी काहीतरी शिकवते, नवीन गोष्टींची जाणीव करून देते तर कधी काही जुन्याच गोष्टींची नव्यानं जाणीव करून देतो. स्पर्श या जाणिवेशी मला नव्यानं ओळख झाली ती गेल्या वर्षी. ओवीचा जन्म झाला आणि ती थेट गेली ते एनआयसीयूमध्ये. तिच्या जन्मानंतर साधारण फक्त ५ सेकंद मी तिला बघितलं असेन. तेही मला चेहरा नीट दिसलाच नव्हता. या ५ सेकंदांच्या भेटीनंतर मी तिला बघितलं ते थेट ३ दिवसांनी; तेही एनआयसीयूमध्येच. मग आमची भेट तिथेच होत राहिली. २८ दिवस.... हा २८ दिवसांचा प्रवास माझ्यासाठी सोपा नक्कीच नव्हता पण अशक्यही नव्हता. या दिवसांमध्ये स्पर्श या जाणिवेला मी आणखी जवळून अनुभवू लागले. 


ओवी प्री टर्म असल्यानं तिचं वजन कमी होतं. वजनवाढीसाठी तिला एनआयसीयूमध्ये ठेवणं गरजेचं होतं. 'किती दिवस' याचं उत्तर डॉक्टरांकडेही नव्हतं. पण या दिवसांत माझी ओळख झाली केएमसी या थेरपीशी. केएमसी म्हणजे कांगारु मदर केअर. ही थेरपी नक्की काय, कशी, किती फायदेशीर याबद्दल डॉक्टरांनी चैतन्यला आणि माझ्या भाचीला सानिकाला सगळं नीट समजावून सांगितलं. त्या दोघांनी मला सगळं छान समजावलं. केएमसी म्हणजे आईला तिच्या बाळाचा स्कीन टू स्कीन टच होईल असं तिनं बसायचं असतं. मी माझ्या छातीला ओवीची छाती लागेल अशी आरामखुर्चीत बसायचे. इथे थेट त्वचेचा कनेक्ट हवा. त्यामुळे एनआयसीयूमध्ये गेल्यावर त्यासाठी आवश्यक ते तिथले कपडे मी घालायचे. ओवीला छातीशी कवटाळून बसायचे. सकाळी नाश्ता झाल्यावर तीन तास आणि रात्री जेवण झाल्यावर तीन तास. ही थेरपी नंतर माझ्या रुटीनचा एक भाग बनू लागली. या थेरपीत दुसरं काहीच करायचं नाही. फक्त तिला छातीशी कवटाळून बसायचं बास.. हे इतकं सोपं वाटत असलं तरी त्यासाठी भरपूर पेशन्स आणि फिटनेस हवा. पेशन्स यासाठी की एकाच स्थितीत इतका वेळ बसणं माझ्यासारख्या मुलीला तर कठीणच. आणि फिटनेस हवा; तो फक्त शारीरिकच नाही तर मानसिकसुदधा. दोन्हीचा फिटनेस त्यावेळी माझ्यात १०० टक्के नव्हताच. त्यामुळे ते कितपत आणि कसं जमेल याबद्दल मी साशंक होते. 

बाळाचं वजन वाढण्यास मदत, आई-बाळाचं नातं घट्ट होण्यास मदत आणि आईला दूध येण्याच्या प्रमाणात वाढ हे या थेरपीचे मुख्य फायदे असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. ही तिन्ही कारणं माझ्यासाठी त्यावेळी अत्यंत महत्त्वाची होती. डिलेव्हरीनंतर आलेला थकवा लगेच जाणं काही शक्य नव्हतं पण तरी मनाची तयारी केली आणि हळूहळू या थेरपीला सुरुवात झाली. सुरुवातीला दोन दिवस मी फक्त सकाळीच या थेरपीसाठी जायचे. त्यानंतर रात्रीसुद्धा जायला लागले. 

या थेरपीत बाळाला दूध पाजल्यानंतर लगेच छातीशी घेतलं की ते थेट पुढच्या दूध पिण्याच्या वेळीच उचलायचं असतं. एनआयसीयूमध्ये ठेवलेल्या बाळांना कमीत कमी हाताळण्याचा प्रयत्न तिथले डॉक्टर्स आणि नर्ससुद्धा करत असतात. त्यामुळे एकदा ओवीला मी केएमसीसाठी घेतलं की थेट तीन तासांनी तिला तिच्या बेडवर ठेवलं जायचं. एकदा का आम्ही दोघी त्या खुर्चीत सेट झालो की मग आमच्या गप्पा सुरू व्हायच्या. ओवीशी मी गप्पा मारायचे. श्लोक, स्तोत्र म्हणायचे. कधी कधी तर मराठी-हिंदी गाणी सुद्धा म्हणायचे. तेव्हापासूनच ती प्रचंड चुळबुळी. सारखी इकडून तिकडे मान करायची. कधी कधी टक्क जागी असायची. मग मी तिचे डोळे मनसोक्त न्याहाळायची. कपाळावर हलकिशी पापी घ्यायचे. कधीतरी शांत झोपायची. मग मीही डोळे मिटून पडायची. मलाही झोप लागायची. मला झोप लागली तर...; अशी भीती वाटायची पण त्यावरही एक उपाय होता. केएमसी बॅग.. केएमसी बॅगमध्ये ओवीला ठेवलं जायचं. त्याला एक बेल्ट होता. त्याची गाठ माझ्या पाठीमागे येईल असा तो बांधला जायचा. म्हणजे आम्हा दोघींना झोप लागलीच तरीही काहीही होऊ शकलं नसतं. तिथल्या सगळ्या नर्सशी मैत्री झाली होती. गप्पांमधून त्यासुद्धा मला खूप रिलॅक्स करायच्या. 'इतकी काळजी करू नका', 'यापेक्षा कमी वजन असलेली बाळं इथून छान होऊन गेली आहेत', 'तुमची मुलगी खूप अॅक्टिव्ह आहे आतापासूनच' असं सगळं त्या जेव्हा सांगायच्या तेव्हा छान वाटायचं. 

केएमसीच्या त्या तीन तासात मला कधी कधी इतकं रडू यायचं; मोठ्याने रडावं वाटायचं. मात्र त्यावेळी ते करण्याचा पर्यायच नव्हता माझ्याकडे. ओवीचा स्पर्श झाल्याचा आनंद वेगळाच असायचा. स्पर्श किती आणि काय काय देऊन जातो आपल्याला ! ते इवले हात माझ्या छातीला लागे. पाय पोटाशी चूळबुळ करायचे. नाक, ओठ यांचा झालेला स्पर्श. कधी कधी या सगळ्याने भरून यायचं. निसर्ग सगळ्यांपेक्षा किती मोठा आहे याचा प्रत्यय पदोपदी येत होता. फिडिंगसाठी मी दर दोन तासांनी एनआयसीयूमध्ये जायचे. त्यामुळे सलग आणि पुरी न झालेली झोप असं असलं तरी केएमसी ही थेरपी मी नियमित केली ते ओवीचा मला होणारा स्पर्श आणि तिचा मिळणारा सहवास यासाठी. माझ्या खोलीत माझं बाळ माझ्या कुशीत नाही, दूर आहे याचं मला वाईट वाटायचं पण मी ते केएमसीचे एकूण सहा तास एंजॉय करायचे. केएमसीचा मला खूप फायदा झाला. ओवीचं वजन वाढत होतं केवळ या कारणासाठी नाही तर तिला मला त्यानिमित्तानं रोज भेटता येत होतं. तिच्याशी माझी रोज नव्याने ओळख होत होती. तिथल्या नर्स मला जेव्हा तिच्या सुधारणेबद्दल सांगायच्या तेव्हा इतका आनंद व्हायचा की सगळं विसरून जायचे मी. एक-एक ग्रॅमने वाढणारं वजन सुखावून जायचं. एखाद्या दिवशी केएमसी ही थेरपी कॅन्सल झाली तरी त्या वेळेत एनआयसीयूमध्ये जाऊन बाहेरूनच तिला बघायचे. 'सगळं ओके ना' असं नर्सना विचारायचे आणि परतायचे. 

ते ३२ दिवस माझ्या आयुष्यातले मला बरंच काही शिकवणारे होते. या प्रवासानं मला वेगळा अनुभव दिला. घरी आल्यानंतरसुद्धा ओवी दोन महिन्यांची होईपर्यंत मी ही थेरपी दवाखान्यात करत होते अगदी तशी नाही पण करत होते. प्रत्येक फीडनंतर अर्धा तास मी तिला घेऊन तशी बसायचे. मग ते मध्यरात्री २ ला असो किंवा पहाटे ४-५ वाजता. आजही अनेकदा मी तिला तसं काही मिनिटं का होईना घेऊन बसते. सहजच... आता ती जास्त चुळबुळ करते ही गोष्ट वेगळी. पण ते काही मिनिटं मनाला आनंद देतात. स्पर्श बरंच काही सांगून जातो असं म्हणतात. ओवीचा स्पर्श जणू मला 'मी आहे तुझ्यासोबत कायम. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर' असं प्रत्येक दिवशी सांगायचा आणि आजही सांगतो.

Friday, April 16, 2021

जमतं का त्याला, तिला, प्रत्येकाला??



तिला बऱ्याचदा गृहित धरलं जातं...

ती करेल, ती निभावेल, तिला जमेल,

तिनं करायलाच हवं.. तिला जमायलाच हवं... 

तिचं कामच आहे ते. तिचंच काम आहे ते.. 

तिची कसली स्वप्नं ?

तिला काही करायचं असलं की त्यावरही हरकत;

हे असं चालत नाही.. ते शोभत नाही... 

अशा चौकटी बांधणारे हात, नजरा असतात... 

स्वयंपाकच तर करतेस, घर तर आवरतेस.. 

इतकं काय त्यात !

तोही करतोच की स्वयंपाक.. देतो तिला एक दिवस आराम... 

पण पुढचं काय ??

स्वयंपाकाच्यानंतरही काहीतरी असतं... 

स्वयंपाकघर आवरणं, नीटनेटकं ठेवणं वगैरे..   

असं काही असतं?? खरंच ? 

ती काही बोललीच 

तर मेल इगो आहेच डोकं वर काढायला...

मनाविरुद्ध करत राहते ती सगळं

काहीही न बोलता... 

पण कधी बोललीच, 

तर 'फार कळतं का तुला', 'खूप खटकायला लागलंय तुला हल्ली' 

हे ऐकण्यासाठी तिचे कान असतात तयार...

हे बोलणारा पुरुषही असतो आणि स्त्रीही

हो स्त्रीसुद्धा... 

हे तिचं काम आणि ते त्याचं 

ही कामाची विभागणी लहानपणापासून तिच्या ओळखीची... 

तिला पर्याय 'ती'च हवी... 

तिची कामं करायला 'तो' नको..

मग तीही पुढच्या पिढीतल्या 'तिला' हेच सांगणार.. 

यात बदल झालाय का ? हो झालाय ना. 

पण सोयीनुसार....

आता तिला बदल हवा असेल तर आधी तिनेच बदलावं.. 

स्वतःला.. स्वतःच्या विचारांना..  

पण हेच होत नाही फारसं.. 

उशिरा का होईना तिनं बदलायचं ठरवलंच, 

तर कधी कधी नको तो शेवट होतो... 

तिला कुठे हवा असतो असा शेवट? नकोच असतो. 

तिला हवं असतं फक्त तिला समजून घेणं, तिच्या मनातलं ओळखणं,

तिला स्वतंत्र विचार करू देणं, तिला माणसासारखं वागवणं...

पण हे जमतं का त्याला, तिला, प्रत्येकाला?? 

#TheGreatIndianKitchen on #Amazonprimevideo !  


 

Thursday, March 18, 2021

प्रिय ओवीस...

प्रिय ओवी, 

एका स्त्रीचं आयुष्य ती आई झाल्यावर बदलतं असं म्हणतात. माझ्यासाठी तो दिवस आजचा. तू आज एक वर्षाची झालीस. मी साडे सात महिन्यांची गरोदर असतानाच तुझा जन्म झाला. 'प्री मॅच्युअर्ड' किंवा 'प्री टर्म' याबाबत ऐकलं, वाचलं होतं. तसंच अशी डिलिव्हरी होणारी मी पाहिली किंवा एकमेव स्त्री नाही याचीही मला जाणीव होती. त्यामुळे सगळं ठीकच होणार या विचाराने मी मानसिकदृष्ट्या तयार होते. तू पोटात असताना आम्ही 'तान्हाजी' बघितला होता. तू अशी अचानक आलीस म्हणून तुझा बाबा गमतीने म्हणतो; ओवीने सर्जिकल स्ट्राइक केला. 😅 पण असो.. तू आलीस आणि आमचं आयुष्यच बदलून गेलं. 


तुझ्या जन्मानंतरचा पहिलाच महिना खडतर प्रवासाचा होता. वजन या एकमेव मुद्द्यासाठी तुला एनआयसीयुमध्ये ठेवलं होतं. ३२ दिवसांनंतर तुला घरी आणलं. हा ३२ दिवसांचा प्रवास कधी कधी अगदी काही सेकंदांसाठी झपकन डोळ्यांसमोरून जातो आणि डोळे भरून येतात. पण मी लगेच भानावर येते. या प्रवासमुळेच मला एक वेगळी ताकद मिळाली आहे. तुला घरी आणल्यानंतर सुद्धा खूप काळजी घ्यावी लागली. घरातल्या सगळ्यांनी मिळून मेहनत घेतली. ते सगळे होते म्हणून मी आणि तुझा बाबा खंबीरपणे उभे राहू शकलो. जसजसे दिवस पुढे जात राहिले तसतशी तुझी प्रगती होत गेली. तुझ्या वजनाची तुलना अप्रत्यक्षरित्या झाली आहे, पुढेही होईल. 'खूपच छोटी आहे', 'नाजूक आहे ना खूप', 'वजन कमी वाटतंय ना' या अशा प्रतिक्रिया पुढेही येतील कदाचित. पण त्याकडे दुर्लक्ष करायचं हे मी मनाशी पक्कं केलंय. तुझ्यासाठी किती, काय आणि का योग्य आहे हे मला कळतं. वजन व्यवस्थित असणं गरजेचं आहेच पण ती एकमेव गोष्ट महत्त्वाची नाही. तू किती अँक्टिव्ह आहेस हेसुद्धा माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. हे अनुभवातून आलेलं शहाणपण आहे. 

मी आजवर कोणत्याच नात्यात आदर्श बनायचा प्रयत्न केला नाही, करणारही नाही. तोच नियम आई या भूमिकेला. मला आदर्श आई बनायचं नाही. मी तुझं सगळं किती चांगलं करतेय हे जगासमोर सिद्ध करायची मला गरज वाटत नाही. मी याचं दडपण घेत नाही, घेणार नाही. माझा सुद्धा आई होण्याचा हा पहिलाच अनुभव आहे. मीही शिकतेय. तू मोठी होताना मी सुद्धा आई म्हणून मोठी होतेय. या प्रवासात मी चुकेन, धडपडेन, चाचपडेन. तेव्हा तू आजवर जसं सांभाळून घेतलंस तसं सांभाळून घे मला. तू प्री मॅच्युअर्ड आहेस याबाबत मला कधीच कमीपणा वाटत नाही. हे सांगितल्यावर लोक हजार प्रश्न विचारतील म्हणून मी कधीच घाबरत नाही. कारण मला तुझ्याबद्दल खात्री वाटते. तू तुझ्या वेळेत, तुझ्या ताकदीनुसार सगळं काही मिळवशीलच. स्त्री आई झाली की तिचं आयुष्य बदलतं हे आता खऱ्या अर्थाने अनुभवतेय, जगतेय... 
आपल्या अनेक नातेवाईकांनी, माझ्या आणि चैतन्याच्या मित्र-मैत्रिणींनी सुदधा तुला अजून प्रत्यक्ष बघितलं नाहीये. पण यानिमित्ताने त्यांना मला सांगायचं आहे की, आपण लवकरच भेटू. तोवर ओवी आणखी मस्ती करू लागेल आणि तुम्हाला तिला भेटून आणखी मजा येईल. 😊

आज तू एक वर्षाची झालीस. खूप मोठी हो, तुझी प्रगती होवो, तुला हवं ते मिळो, उत्तम आरोग्य लाभो, अजून मस्ती करण्याची ताकद मिळो; याच शुभेच्छा ! 🤗

बाकी आम्हा सगळ्यांचं तुझ्यावर प्रचंड प्रेम आहेच ! 😘

Saturday, May 9, 2020

आई होणं ‘खरंच’ सोपं नाही...



आई होणं खरंच सोपं नाही... या वाक्यातल्या खरंच या शब्दावर जोर द्यायालाच हवा. प्रत्येक आईला या 'खरंच' या शब्दाचा नेमका अर्थ समजेल. आईची घालमेल, आई झालीस की कळेल, आई आहे शेवटी, आईला सगळं कळतं, आई होणं सोपं नाही, आईसाठी तिची मुलं नेहमीच लहान असतात, आईचं काळीज या सगळ्या वाक्यांचा अर्थ तेव्हाच कळतो जेव्हा एक स्त्री एका जीवाला जन्म देते. प्रसूती होताना तिला होणाऱ्या वेदना ती एका झटक्यात दूर करते जेव्हा तिला तिच्या बाळाच्या रडण्याचा आवाज येतो. बाळाच्या रडण्याच्या आवाजाने खुश होण्याचा हा तिच्यासाठीचा एकमेव क्षण ! यानंतर बाळाचं रडणं म्हणजे त्या आईसाठी चिंतेचा विषय बनतो.

आज मातृदिन... आजवर तिने तिच्या आईला शुभेच्छा दिल्या. आता तिला शुभेच्छा देणारं कोणीतरी आलंय. जे जे तिने आजवर एक मुलगी म्हणून अनुभवलंय ते सगळं आता तिची लेक अनुभवणार आहे. आणि जे तिच्या आईने बघितलं ते ती स्वत: आता आई म्हणून बघणार.

आजवर तिने मारलेली ‘आई अशी हाक आता कोणीतरी तिला मारणार. ही हाक आल्यावर ती कोणाला तरी ओ देणार. तिच्या लेकीने तिच्याशी हुज्जत घातली की ती तेच वाक्य तिला ऐकवणार जे तिने तिच्या आईला ऐकवलेलं असतं; 'मी तुझीच लेक आहे.. तुझ्यासारखीच असणार'. तेव्हा तिचे शब्द संपणार. हे तिच्या बालपणीचं चित्र ती पुन्हा एकदा जगणार.

आई कसलाच हिशेब ठेवत नाही.. ना तिने तिच्या मुलांसाठी किती केलंय  याचा ना त्यांना पानात किती वाढलंय याचा. 'अगं तू आधी दोन पोळ्या वाढल्या होत्यास. परत तिसरी?' असं ते तिलाच गणित शिकवतात. पण आपल्या बळाने रोज आदल्या दिवसापेक्षा जास्त दूध प्यावं म्हणून तीच झटत असते तेव्हा त्या गणिताची उजळणी आठवल्याशिवाय राहत नाही. आपल्या पोटात दोन घास गेल्याशिवाय आईला अन्न गोड लागत नाही. तेव्हा 'इतकं काय.. जेवून घ्यायचं ना' असं आपण तिला सहज म्हणतो. पण जेव्हा बाळाला दूध पाजल्याशिवाय तिला जेवण जात नाही तेव्हा त्या 'इतकं काय' चा राग येतो.

काही वेळा काही गाणी आपण त्याची चाल आवडली म्हणून गुणगुणत असतो. पण त्यातल्या ओळींचा अर्थ वयोपरत्वे समजत जातो. देव जरी मज कधी भेटला, माग हवे ते माग म्हणाला, म्हणेन प्रभू श्री माझे सारे जीवन देई मम बाळाला...’ हे जुनं गाणंही त्यापैकीच एक. त्यातल्या ओळींचा अर्थ आता खऱ्या अर्थाने कळतोय. माझं ते सगळंच्या सगळं; अगदी माझं आयुष्यच तुझं आणि तुझ्याचसाठी ! ही नवी भावना तिच्यात रुजत चाललीये आता. 'मी माझ्या बाळासाठी वाट्टेल ते करेन' हे वाक्य म्हणण्याची ताकद आई झाल्यावरच येते. तिची मुलं शिक्षण, नोकरीसाठी परशहरी, परदेशात जाणार असतात तेव्हा आईची होणारी घालमेल बघून घरातलेच तिची गंमत करतात. इतकं काय त्यात असंही काहींना वाटतं. पण जेव्हा आई तिच्या झोपलेल्या बाळाला आतल्या खोलीत जरा वेळ सुद्धा एकट्याला सोडू शकत नाही तेव्हा आईची ती घालमेल आठवते. 

बाळंतपणाला माहेरी गेल्यावर मुलगी जेव्हा तिच्या आईला सतत 'माझ्यावेळी तू कसं मॅनेज केलंस गं?', 'मी कशी होते', ' मी किती त्रास दिलाय', ‘मी किती जागवलंय, 'तू काय केलं होतंस अमुक अमुक वेळी', 'मला काही झालं की तू कशी रिअक्ट व्हायचीस' असे प्रश्न एक मुलगी म्हणून विचारत असली तरी त्यावेळी तिच्यात एक 'आई' तयार होत असते. तिच्यासाठी जसं एक 'माहेर' आहे तसंच आता तिच्या लेकीसाठी तिचं घर माहेर असेल ही भावना तिच्यासाठी सुखवणारीच! 'किती आई आई करते' असं आपण एखाद्याला किंवा एखादीला चेष्टेने म्हणतो पण आता ही हाक ऐकायला त्या नवमातेचे कान चोवीस तास आतुर झालेले असतात.

किती आणि काय काय आपण सहज बोलून गेलेलो असतो. मागचा पुढचा विचार न करता.. पण ते सगळं आपल्याच जवळ येऊन थंबणारं आहे, याची तेव्हा कल्पना नसते. पण त्या वेळी आपण दुसऱ्या बाजूला असतो. समोरच्या भूमिकेत! आईच्या भूमिकेत! आणि म्हणूनच शा वेळी 'आई' या नव्या भूमिकेतून बघताना समस्त आई वर्गाविषयीचा आदर, प्रेम, आपुलकी आणखीच वाढते. अशा वेळी काकस्पर्श सिनेमातलं जन्म बाईचा बाईचा…’ या गाण्यातल्या शेवटच्या ओळी आठवतात आणि तितक्याच भावतातही...

काय मी सांगू काय हे झाले.. 
का तुला कहाले मागणे आले...
माय ही सांगे अर्थ मायेचा...
जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा..
एक आईचा आईचा एक ताईचा.. !

Tuesday, May 14, 2019

‘शाळा’ घेतलेल्या इमारती !



आपल्या काही आठवणींची आठवण हल्ली फेसबुक करून देत असतं. 'यु हॅव मेमरीज विथअसं नोटिफिकेशन येतं आणि आपण सुद्धा त्या दिवशी केलेल्या पोस्टमध्ये रमतो. ती आठवण रिशेअर सुद्धा करतो. मागे अशाच एका आठवणीचं नोटिफिकेशन आलं आणि मी ती आठवण शेअर केली.
'या इमारतीने आमची खऱ्या अर्थाने 'शाळाघेतलीअशी कॅप्शन लिहून माझ्या शाळेचा तो फोटो पुन्हा एकदा शेअर केला. बदलापूरची कै. द्वारकाबाई गणेश नाईक विद्यालय ही माझी शाळा.

मन आणखी थोडं मागे गेलं. आधीच्या शाळेकडे धाव घेतली मनाने. पाचवीपर्यंत कल्याणच्या गजानन विद्यालय या शाळेत शिकले. या शाळेतच माझी आई आणि सख्खी आत्या या दोघी शिक्षका होत्या. मी जरा कुठे मस्ती केलीखोड्या काढल्या की दोघींकडे लगेच रिपोर्ट जायचा. त्यामुळे जबाबदारीने वागणं हे आलंच. माझ्या या शाळेत फार मोठं मैदान नव्हतं. त्यामुळे स्पोर्ट्स डेला आम्हाला शाळेजवळच्याच एका मैदानात जावं लागे. त्या वेळी आम्हा मुलांचा हिरमोड व्हायचा. पण तेव्हा समोर असलेल्या गोष्टीशी 'जमवूनघ्यायला आम्ही शिकलो. दुसऱ्या मैदानात जावं लागलं तरी तिथे गेल्यावर आमचा दंगा सुरू. गोष्टी पटकन स्वीकारून पुढे जाणं हेही नकळतपणे अंगवळणी पडलं.

पुढच्या शिक्षणासाठी बदलापूरच्या नाईक विद्यालयात गेले. तिथे स्पर्धेत कसं शिरायचं आणि कसं टिकून राहायचं हे कळलं. अभ्यासात मी जितक्या टक्केवारीवर असायचे त्याच वर्गात तसे आणखी बरेच जण होते. त्यामुळे तिथे स्पर्धा सुरू झाली होती. प्रत्येक परीक्षेनंतर मी एका वहीच्या शेवटच्या पानावर स्पर्धेत असलेल्या सगळ्यांची नावं, विषय असा एक छोटा तक्ता तयार करायचे. कोणत्या विषयात कोणाला किती गुण मिळाले हे लिहायचे. त्याची बेरीज करून टक्केवारी काढायचे. नंबर द्यायचे. हो, हे सगळे उद्योग मी केले आहेत. या तक्त्यात मी कधी पहिल्या दहात असायचे तर कधी नसायचे. पण म्हणून त्यापैकी कोणासोबतही माझी मैत्री बिघडली नाही. आजही तितकीच तशीच चांगली आहे. हेच मला त्या शाळेने शिकवलं. स्पर्धेत सहभागी व्हा. पण ती तेवढ्यापुरतं ठेवा. कधी हराल, कधी जिंकाल, कधी अधेमधे रहाल. पण त्याने नुकसान होणार नाही.

मुलुंडच्या वझे केळकर कॉलेजची बातच वेगळी. घरापासून लांब असलेल्या कॉलेजमध्ये जायचं म्हणजे थ्रील होतं माझ्यासाठी. पाच वर्ष धमाल केली या कॉलेजमध्ये. स्टेज फिअर काय असतं ते प्रत्यक्षात इथे अनुभवलं. तिथेच त्यावर मातही केली. अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला. कार्यक्रम आयोजित केले. वेळोवेळी आलेली आव्हानं शिताफिने पेलली. अशा स्पर्धांमधूनच लोकांशी बोलायला शिकले, असंख्य लोक संपर्कात आले. ते आजही ओळखतात, बोलतात. मध्यभागी मैदान आणि त्याच्या चारही बाजूंनी पसरलेली इमारतअसं आमचं कॉलेज. मैदानात उभं राहून इमारतीकडे बघितलं की मनात येणारी भावना चेहऱ्यावर हसू आणल्याशिवाय राहत नाही.

पत्रकारितेच्या शिक्षणासाठी गाठलं ते झेविअर्स कॉलेजचं झेविअर इन्स्टिट्युट ऑफ कम्युनिकेशन. इथे सगळ्यात महत्त्वाची आणि पुढे प्रचंड उपयोगी ठरलेली गोष्ट मी शिकले. आपल्या स्वभावाविरुद्ध स्वभाव असलेल्या व्यक्तीशी जमवून घेणं. ते कॉलेज सोडून आता दहा वर्षं होतील. पण आजही तिथे गेलं की त्या जागेमधला आपलेपणा जाणवतो. आम्हाला अनेक प्रोजेक्ट्स करावे लागे. त्यावेळी वेगवेगळ्या विद्यार्थ्यांसोबत ते करावं लागे. अशावेळी एका गटात असलेल्या सगळ्या सदस्यांशी जमायचंच असं अजिबात नव्हतं. खटके उडायचेच. पण तेव्हा कळलेला एक मंत्र म्हणजे; न पटणारे लोक नोकरीच्या ठिकाणीही असंख्य मिळतील. तेव्हा सतत नोकरी बदलण्याचा पर्याय नसणार. त्यांच्याशी जमवून घ्यावंच लागेल. नोकरी टिकवावीच लागेल. नोकरीच्या ठिकाणी अशी न पटणारी व्यक्ती समोर आली की तो मंत्र कायम आठवतो.

आपण शाळाकॉलेजमध्ये बरंच काही शिकतो. कधी शिक्षक तर कधी मित्रपरिवार शिकवतो. ती वास्तुसुद्धा आपल्याला काही सांगू पाहत असते. या वास्तुंबद्दलच्या असंख्य आठवणी आपल्या मनात असतात. खरं तर वास्तु म्हणजे निर्जीव गोष्ट; तरीसुद्धा ती जागातिथल्या वाईब्स हव्याहव्याशा वाटतात. माझ्यासाठी मग ते झेविअर्समधलं कॅंटीन असोनाईक विद्यालयातील मोठं झाडकेळकर कॉलेजमधली तालीम करायची एसआरसीची जागा किंवा गजानन विद्यालयातील बेसमेंटसारखी प्रार्थना म्हणायची जागा... हे आजही खूप स्पष्ट आठवतं. माझ्या बॅचमधल्या बऱ्याच जणांना कधी कधी असं वाटतंआपल्याला आपल्या शाळेने, कॉलेजने काय दिलंकाहीच नाही. मला मात्र नेहमी वाटतंते आपल्याला भरभरून देत असतं. आपल्याला ते दिसलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा परिणाम हा आपल्या प्रगतीशी, विकासाशी, आर्थिक स्थैर्याशी कसा ठरवता येईल? आणि तो का असावाकधीतरी ती फक्त एक शिकण्याची प्रक्रिया नसू शकते का? त्यामुळे माझं माझ्या सगळ्या शाळांवर, कॉलेजांवर, नोकरी केलेल्या आणि करत असलेल्या सगळ्या इमारतींवर आजही तितकंच प्रेम आहे आणि ते कायम राहील.

मी इथेच धडपडलेइथेच आपटलेइथेच हरले. इथेच जिंकलेहीइथेच शिकलेइथेच सावरले आणि इथेच मोठीही झाले...
खऱ्या अर्थाने या इमारतींनी माझी 'शाळाघेतली !