Saturday, January 26, 2019

वेळापत्रक


वेळापत्रक.... हा शब्द आपल्या सगळ्यांच्या अगदी खूप जवळचा. अगदी लहानपणापासून याभोवती आपण फिरतो. शाळेत असताना दप्तर भरताना दुसऱ्या दिवशीचं वेळापत्रक बघितलं जायचं. कॉलेजमध्ये असताना ते पाठ असायचं. पुढे नोकरीच्या ठिकाणी दिवसभराच्या कामाचं वेळापत्रक. पण हे सगळं करत असताना आपण आपल्या आयुष्याचंही एक वेळापत्रक बनवत असतो. शाळा संपली की कोणत्या शाखेत पुढचं शिक्षण घ्यायचं., ग्रॅज्युएशन कशात करायचं, त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन कुठून आणि कधी करायचं, मधे एखादा ब्रेक घ्यायचा का, नोकरी कितव्या वर्षी लागायलाच हवी, एका ठिकाणी किती वर्ष नोकरी करायची, नोकरी बदलताना कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायचं, नोकरीत स्थिरावलो की लग्न करायचं, लग्न झालं की मूल कोणत्या वर्षी होऊ द्यायचं, मुलांसाठी आणि आपल्या वृद्धापकाळासाठी आर्थिक तरतूद किती आणि कधीपासून सुरु करायची, देश-जग फिरायचं आहे वगैरे वगैरे.... किती कॅल्युलेटेड जगतो आपण....! हो आपण सगळेच. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आपल्याच आयुष्याचं वेळापत्रक आखत असतो. या वेळापत्रकात सतत असंख्य क्रिया असतात. बऱयाच इच्छा, आकांक्षा, स्वप्न असतात. काही पूर्ण होतात, काही पूर्ण होण्याच्या मार्गावर असतात, काही पूर्ण होत नाहीत तर काही मनातच राहतात... कायम...

आयुष्याच्या या वेळापत्रकात एका गोष्टीचा विसर पडतो. मृत्यु....! खरं तर ते कोणी विसरत नाही पण त्याची या वेळापत्रकात दखल घ्यावी असं फारसं कोणाला वाटत नाही. भीती हे त्यामागचं कारण असू शकतं. पण मृत्यु हे अंतिम सत्य आहे आणि ते प्रत्येकाला कधी ना कधी तरी स्वीकारावंच लागतं. या वेळापत्रकात प्रत्येक गोष्ट साध्य करण्यासाठी आपण सगळेच जीवाचं अगदी रान करतो. ठरल्याप्रमाणे ती तशीच कशी मिळेल यासाठी झटत असतो. स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रचंड मेहनत करतो. व्यावसायिक, वैयक्तिक अशा दोन्ही आयुष्याच्या वेळापत्रकासोबतच आपण सतत धावत असतो. पण, का? कशासाठी? कोणासाठी? धावायची खरंच इतकी गरज आहे का? खरं तर बिलकुलच नाही... नाही मिळाली एखादी गोष्ट तर बिघडलं कुठे? नाही झालं प्रमोशन तर आभाळ कोसळणार आहे का? नाही मिळाला आनंद एखाद्या गोष्टीचा तर आयुष्य बेचव होणार आहे का? सुटली एखादी गोष्ट तुमच्या हातून तर श्वास घ्यायचा थांबणार आहात का? यापैकी काहीच होणार नाही तर मग इतका आटापिटा का? हा आटापिटा केलाच तरी तुम्हाला हवं ते सगळंच साध्य होईल याची खात्री कुठे आहे? या धावपळीत तुम्ही तुमचं मन किती जपता, तुम्ही स्वत:ला किती वेळ देता, आरोग्याकडे किती लक्ष देता, तुम्हाला काय वाटतं याला किती महत्त्व देता?

जर तुमचं आयुष्य अर्ध्या वाटेवर थांबलं किंवा संपलं तर???  थांबणं आणि संपणं यात फरक आहे. पण दोन्ही गोष्टी कोणालाच नको असतात. जर थांबलं तर ते पुन्हा सुरु होण्याची किमान शक्यता तरी असते. पण जर ते संपलं तर तुम्ही आखलेलं तुमचं आयुष्याचं वेळापत्रकही त्याचबरोबर संपतं. तुमच्या मनातल्या इच्छा तिथेच नष्ट होतात, तुमच्या स्वप्नांचा शेवट होतो, तुमच्या मतांचा, विशिष्ट विषयाबाबत तुम्ही घेतलेल्या भूमिकेचा तिथेच अंत होतो. तुम्ही आज संपलात तर तुम्हाला उद्या काय करायचं होतं हेदखील संपतं. एका झटक्यात होत्याचं नव्हतं होतं ! सहा महिन्यांपूर्वी माझ्या नवऱ्याचा म्हणजे चैतन्यचा अत्यंत जवळचा, अगदी जिवलग मित्र हृदयविकाराने गेला. वय वर्ष ३२. ऑफीसला जाताना बस स्टॉपवर अचानक कोसळला. वीस मिनिटात संपलं सगळं. हे काय वय होतं का जाण्याचं ? खरं तर हा प्रश्न किती चुकीचा आहे. आपण कोण ठरवणारे आपण कधी जाणार ते? आपण जर आपल्या वेळापत्रकात आपल्या मृत्युला समाविष्टच करुन घेतलं नाहीये तर त्याची वेळ ठरवण्याचा आपल्याला हक्कच नाही. त्याच्या जाण्याने धक्का मात्र बसला. मनात विचार आला की त्याने त्यानंतरच्या वीकेण्ड्सचे प्लॅन्स केले असतील, गेल्या वर्षीच्या गणेशोत्सवात कोणाकडे जायचं हे ठरवलं असेल, पावसाळ्यात कुठे पिकनिकला जायचं, काहीतरी शिकायचंय असं बरंच काही त्याने ठरवलं असेल.. ते सगळं त्याच्यासोबतच गेलं.. कायमच...! आपल्या जगण्याची निश्चितता आपणच ठामपणे सांगू शकत नाही. जगात एकच गोष्ट निश्चित असते ती म्हणजे अनिश्चितता ! मृत्यु इतकंच हेही सत्य पचायला हवं !

असंच सगळं होणार असेल तर काय उपयोग त्या वेळापत्रकाचा ? कशासाठी करायचं वेळापत्रक ? तेही आयुष्याचं ? तुम्ही म्हणाल वेळापत्रक अगदीच नाही केलं तर आयुष्य सैरभैर होईल, कसलीच शिस्त नसेल, कोणीही कसंही वागेल, कुटुंबव्यवस्थेची घडी विस्कटेल... पण ठाम वेळापत्रक न करताही आयुष्यात अनेक गोष्टी साध्य करता येतातच, हेही स्वीकारायलाच हवी. वेळापत्रकाला चिकटून बसायला नको. आपण आणि आपलं वेळापत्रक फ्लेक्झिबल असलं पाहिजे. त्याच्यावर अडून बसलो की संपतं सगळं. चैतन्यच्या मित्राने असं वेळापत्रक केलं होतं की नाही माहित नाही. पण आपण सगळेच अप्रत्यक्षपणे ते उराशी बाळगून असतो. त्याला म्हणावा तसा ताणही नव्हता. कुटुंबही चांगलं. मित्रपरिवारही छान. त्यामुळे तो कसल्या तणावामुळे गेला असं वाटत नाही. पण कदाचित त्याने आखलेल्या वेळापत्रकाच्या धावपळीशी त्याला जमवून घेता आलं नसावं. याच वेळापत्रकामुळे त्याचं त्याच्या आरोग्याकडे दुर्लक्ष झालं असावं किंवा त्याने त्याकडे लक्ष द्यायला हवं हे त्याला कळलं नसावं. जे झालं ते वाईटच आहे. याआधीही आजूबाजूला असं वय कमी असलेल्या लोकांच्या जाण्याच्या बातम्या कळल्या आहेत. पण त्या मित्राचा उल्लेख अगदी रोज माझ्या आणि चैतन्यच्या बोलण्यात यायचा. त्यामुळे मी त्याला फारशी भेटली नसले, बोलले नसले तरी त्याचं अस्तित्व नेहमी जाणवायचं. जाणवत राहील.

या सगळ्यातून मला एक गोष्ट कळून चुकली की आपल्याला वेळापत्रक आखायचंच असेल तर त्यावर मातही करता आली पाहिजे. गोष्टी वेळीच स्वीकारल्या पाहिजेत. आपलं वेळापत्रक हे अत्यंत फ्लेक्झिबल म्हणजे लवचिक असायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं थोडं थांबायला हवं, मोकळा श्वास घ्यायला हवा, डोक्यावरचं ओझं थोडावेळ का होईना खाली उतरवायलाच हवं !



10 comments:

  1. सहमत... एकदम बरोबर...

    ReplyDelete
  2. खरंय...uncertainty is certain असं म्हणतात ते खरंच आहे. अनेक अनुभवातून हे शिकलेय. ब्लॉग खूपच छान झालाय.

    ReplyDelete
  3. चैताली खरोखर ऊत्तमच लिहीलय,आणि हे जीवनातले वास्तव आहे, सुंदर अशीच प्रकट होत रहा
    खूप खूप शुभेछा!

    ReplyDelete
  4. फार सुंदर विचार चैतु.....सगळंच किती गृहीत धरतो ना आपण....आपलं आयुष्य सुद्धा..... नेहमी सत्यात आणि वर्तमानात जगायला हवं हेच खरं....तुझ्या लेखातून प्रत्येक गोष्टीच वेळापत्रक अगदी flexible असायला हवं हे खरंच प्रकर्षाने जाणवलं

    ReplyDelete
  5. fact of life! mast lihilays chaitu

    ReplyDelete
  6. Khupach chan aani Satya lihil aahes...
    Asach lihit Raha... All the best...

    ReplyDelete