वाढदिवसाविषयी अनेकांना
अप्रुप वाटतं. मलाही वाटतं. पण आता वयोमानानुसार त्याच अप्रुप कमी कमी होतंय. पण या वर्षीचा माझा वाढदिवस खास होता. या वर्षी मी विशीतून
तिशीत प्रवेश केला. ३० वर्षं पूर्ण! मुलींना वय विचारू नये, असं का म्हणतात
हे मला आजतागायत कळलेलं नाही. कळून घ्यायचंही नाही. मला माझं वय सांगायला कधीच लाज
वाटली नाही. वाटणारही नाही. वय आहे ते.. लपवून ठेवायला खजिना नाही. तुम्ही कितीही
लपवलंत तरी ते समोर येतच. पण हे वय समोर आलं की मात्र काही जण बिलकुल गप्प बसत
नाहीत. एखादी मुलगी ३० वर्षांची झाली म्हणून इतरांनाच जास्त काळजी असते. माझ्या कित्येक मैत्रिणींच्या बाबतीत असे प्रसंग घडलेले मी पाहिलेले, ऐकलेले आहेत. त्या
मुलीचं लग्न झालं नसेल तर ‘मग कधी करणार आता लग्न? ’, जर तिला एखादा मुलगा आवडला असेल पण इतक्यात लग्न करणार नसेल तर ‘आता तरी करा लग्न. ३० पूर्ण झाले ना. पुढे सगळं जड जाईल हा’ आणि जर एखाद्या ३० वर्षीय तरुणीचं लग्न झालं असेल आणि तिच्या लग्नाला
साधारण दोन-चार वर्ष झाली असतील तर ‘अगं अजून किती प्लॅनिंग
करणार? आता करा विचार’ हा प्रश्न तिला थेट
विचारला जातो. तर कधी अडूनअडून खुसपुस करत ‘तिच्या लग्नाला चार
वर्षं झाली ना. तिचं वयही वाढतंय तरी अजून तिला मूल नाही ?’ असं गॉसिप केलं जातं. या
सगळ्या फुकटच्या चौकशा करणाऱ्यांना मला एकच सांगावसं वाटतं, ‘तुम्ही तुमचं बघा...’ आणखी सोप्या आणि स्पष्ट
शब्दांत सांगायचं तर, ‘धिस इज नन ऑफ युवर
बिझनेस!’….
एखाद्या विवाहित तरुणीचं
अचानक वजन वाढलं असेल; तर ‘ती गरोदर आहे वाटतं’ अशी शंका व्यक्त केली
जाते. तसंच ती बरेच दिवस माहेरी राहायला गेली असेल तर ‘या वेळी खूप दिवस राहिली
ना ती. काही गडबड आहे का? ’ ही गडबड म्हणजे
गरोदरपणा... मला या दोन्ही वाक्यातलं लॉजिक कळत नाही. वजन वाढण्यामागे इतर अनेक कारणं असूच शकतात, हा साधा विचार अशा लोकांना का शिवत नाही? आणि माहेरी काही 'गडबड' असेल तरच इतके दिवस राहता येतं का? या प्रश्नाचं उत्तर मिळेल का? आपल्याकडे ना ठरलेलं असतं. अमुक वर्षी लग्न आणि अमुक वर्षी मूल
जन्माला घालणं. हे ठरवणार कोण? जिच्या पोटात, शरीरात ते
मूल वाढणार आहे तिने काहीच ठरवायचं नाही का? उलट तिनेच ठरवायला हवं. तिशीत असलेल्या विवाहित तरुणीला मूल नाही हा अजूनही टॅबू का वाटतो लोकांना ? तसंच त्याच वयाच्या मुलीचं लग्न झालं नसेल तर ती लाजिरवाणी गोष्ट का वाटते? ‘लोक काय म्हणतील’ हा अतिशय ओव्हररेटेड विचार मुळापासून कधी उपटून काढणार?
आजवर वयाचे काही महत्त्वाचे
टप्पे पार केले. १८ वं वर्ष, विशीची सुरूवात, २५ वं वर्ष आणि आता ३० वं
वर्षं... यानंतरही अनेक महत्त्वाचे टप्पे पार करायचे आहेत. पण ही वर्ष एखाद्याचं
आयुष्य स्थिरस्थावर होण्यासाठी महत्त्वाची असतात. म्हणून त्यांचं विशेष महत्त्व वाटतं. हे सगळे टप्पे
उत्साह, ऊर्जा देणारे असतात. पण प्रत्येक टप्प्याला काहीना काही साइड एफेक्ट्स
असतातच. कदाचित ते तुम्हाला थेट दिसणार नाहीत पण सभोवतालच्या परिस्थितीमुळे, लोकांमुळे जाणवतील हे नक्की. ते हाताळण्याचं विशेष कौशल्य अंगी असायलाच हवं.
एखाद्या तरुणीच्या वयाचा
संबंध तिच्या लग्न आणि तिला मूल होणं याच्याशीच जोडला जातो. तिच्या नोकरीशी कधीच
कसा जोडला जात नाही? एखाद्या २८ वर्षीय तरुणीबाबत ‘ती अजून सेटल झाली नाही.
तिला चांगली नोकरी मिळाली नाही’ असं का बोललं जात नाही? ‘तिचं २८ वय आहे. लग्नासाठी बघायला सुरूवात करु या’ हे लगेच ऐकायला मिळतं. योग्य
वेळी लग्न आणि मूल होणं याबाबत बोलण्याचा हेतू शास्त्रीयदृष्ट्या बरोबर असला तरी त्यात तिसऱ्या
व्यक्तीने कितपत हस्तक्षेप करायचा हा प्रश्न उरतोच. काहींची त्यामागे फक्त आणि
फक्त काळजीच असली तरीही त्यातही त्यांनी किती बोलावं याही प्रश्नाचा विचार करावा.
तरुणीने लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर तिला मूल झालं म्हणजेच तिच्या आयुष्याला पूर्णविराम
लागला असं नसतं. तसं नसावंच. या सगळ्यामागची सगळ्या प्रकारची कारणं माहित असली तरी
त्या तरुणीला लग्न आणि मूल होणं याबाबत सतत टोचण्यात काय अर्थ आहे! पण हे सगळं त्यांना समजत नसेल तर ‘धिस इज नन ऑफ युवर बिझनेस'; असंच म्हणण्याची वेळ येईल.
Ekdum spasht lihil aahes... Khup chan...
ReplyDeleteExcellent chaitu
ReplyDeleteNice one . . But we live in a culture where people are more interest ed in others matter dan their . Mag kadhitari lokancha tond band karayCha mhanun he tappe paar padave lagtat ..Thode far te yogya pan astat ..Pan lokanna vatta mhanun nahi .. generaly or naturaly barobar astat asa mhanu .
ReplyDelete