Friday, April 23, 2021

स्पर्श...


कठीण परिस्थिती आपल्याला बरंच काही देऊन जाते. कधी कधी काहीतरी शिकवते, नवीन गोष्टींची जाणीव करून देते तर कधी काही जुन्याच गोष्टींची नव्यानं जाणीव करून देतो. स्पर्श या जाणिवेशी मला नव्यानं ओळख झाली ती गेल्या वर्षी. ओवीचा जन्म झाला आणि ती थेट गेली ते एनआयसीयूमध्ये. तिच्या जन्मानंतर साधारण फक्त ५ सेकंद मी तिला बघितलं असेन. तेही मला चेहरा नीट दिसलाच नव्हता. या ५ सेकंदांच्या भेटीनंतर मी तिला बघितलं ते थेट ३ दिवसांनी; तेही एनआयसीयूमध्येच. मग आमची भेट तिथेच होत राहिली. २८ दिवस.... हा २८ दिवसांचा प्रवास माझ्यासाठी सोपा नक्कीच नव्हता पण अशक्यही नव्हता. या दिवसांमध्ये स्पर्श या जाणिवेला मी आणखी जवळून अनुभवू लागले. 


ओवी प्री टर्म असल्यानं तिचं वजन कमी होतं. वजनवाढीसाठी तिला एनआयसीयूमध्ये ठेवणं गरजेचं होतं. 'किती दिवस' याचं उत्तर डॉक्टरांकडेही नव्हतं. पण या दिवसांत माझी ओळख झाली केएमसी या थेरपीशी. केएमसी म्हणजे कांगारु मदर केअर. ही थेरपी नक्की काय, कशी, किती फायदेशीर याबद्दल डॉक्टरांनी चैतन्यला आणि माझ्या भाचीला सानिकाला सगळं नीट समजावून सांगितलं. त्या दोघांनी मला सगळं छान समजावलं. केएमसी म्हणजे आईला तिच्या बाळाचा स्कीन टू स्कीन टच होईल असं तिनं बसायचं असतं. मी माझ्या छातीला ओवीची छाती लागेल अशी आरामखुर्चीत बसायचे. इथे थेट त्वचेचा कनेक्ट हवा. त्यामुळे एनआयसीयूमध्ये गेल्यावर त्यासाठी आवश्यक ते तिथले कपडे मी घालायचे. ओवीला छातीशी कवटाळून बसायचे. सकाळी नाश्ता झाल्यावर तीन तास आणि रात्री जेवण झाल्यावर तीन तास. ही थेरपी नंतर माझ्या रुटीनचा एक भाग बनू लागली. या थेरपीत दुसरं काहीच करायचं नाही. फक्त तिला छातीशी कवटाळून बसायचं बास.. हे इतकं सोपं वाटत असलं तरी त्यासाठी भरपूर पेशन्स आणि फिटनेस हवा. पेशन्स यासाठी की एकाच स्थितीत इतका वेळ बसणं माझ्यासारख्या मुलीला तर कठीणच. आणि फिटनेस हवा; तो फक्त शारीरिकच नाही तर मानसिकसुदधा. दोन्हीचा फिटनेस त्यावेळी माझ्यात १०० टक्के नव्हताच. त्यामुळे ते कितपत आणि कसं जमेल याबद्दल मी साशंक होते. 

बाळाचं वजन वाढण्यास मदत, आई-बाळाचं नातं घट्ट होण्यास मदत आणि आईला दूध येण्याच्या प्रमाणात वाढ हे या थेरपीचे मुख्य फायदे असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. ही तिन्ही कारणं माझ्यासाठी त्यावेळी अत्यंत महत्त्वाची होती. डिलेव्हरीनंतर आलेला थकवा लगेच जाणं काही शक्य नव्हतं पण तरी मनाची तयारी केली आणि हळूहळू या थेरपीला सुरुवात झाली. सुरुवातीला दोन दिवस मी फक्त सकाळीच या थेरपीसाठी जायचे. त्यानंतर रात्रीसुद्धा जायला लागले. 

या थेरपीत बाळाला दूध पाजल्यानंतर लगेच छातीशी घेतलं की ते थेट पुढच्या दूध पिण्याच्या वेळीच उचलायचं असतं. एनआयसीयूमध्ये ठेवलेल्या बाळांना कमीत कमी हाताळण्याचा प्रयत्न तिथले डॉक्टर्स आणि नर्ससुद्धा करत असतात. त्यामुळे एकदा ओवीला मी केएमसीसाठी घेतलं की थेट तीन तासांनी तिला तिच्या बेडवर ठेवलं जायचं. एकदा का आम्ही दोघी त्या खुर्चीत सेट झालो की मग आमच्या गप्पा सुरू व्हायच्या. ओवीशी मी गप्पा मारायचे. श्लोक, स्तोत्र म्हणायचे. कधी कधी तर मराठी-हिंदी गाणी सुद्धा म्हणायचे. तेव्हापासूनच ती प्रचंड चुळबुळी. सारखी इकडून तिकडे मान करायची. कधी कधी टक्क जागी असायची. मग मी तिचे डोळे मनसोक्त न्याहाळायची. कपाळावर हलकिशी पापी घ्यायचे. कधीतरी शांत झोपायची. मग मीही डोळे मिटून पडायची. मलाही झोप लागायची. मला झोप लागली तर...; अशी भीती वाटायची पण त्यावरही एक उपाय होता. केएमसी बॅग.. केएमसी बॅगमध्ये ओवीला ठेवलं जायचं. त्याला एक बेल्ट होता. त्याची गाठ माझ्या पाठीमागे येईल असा तो बांधला जायचा. म्हणजे आम्हा दोघींना झोप लागलीच तरीही काहीही होऊ शकलं नसतं. तिथल्या सगळ्या नर्सशी मैत्री झाली होती. गप्पांमधून त्यासुद्धा मला खूप रिलॅक्स करायच्या. 'इतकी काळजी करू नका', 'यापेक्षा कमी वजन असलेली बाळं इथून छान होऊन गेली आहेत', 'तुमची मुलगी खूप अॅक्टिव्ह आहे आतापासूनच' असं सगळं त्या जेव्हा सांगायच्या तेव्हा छान वाटायचं. 

केएमसीच्या त्या तीन तासात मला कधी कधी इतकं रडू यायचं; मोठ्याने रडावं वाटायचं. मात्र त्यावेळी ते करण्याचा पर्यायच नव्हता माझ्याकडे. ओवीचा स्पर्श झाल्याचा आनंद वेगळाच असायचा. स्पर्श किती आणि काय काय देऊन जातो आपल्याला ! ते इवले हात माझ्या छातीला लागे. पाय पोटाशी चूळबुळ करायचे. नाक, ओठ यांचा झालेला स्पर्श. कधी कधी या सगळ्याने भरून यायचं. निसर्ग सगळ्यांपेक्षा किती मोठा आहे याचा प्रत्यय पदोपदी येत होता. फिडिंगसाठी मी दर दोन तासांनी एनआयसीयूमध्ये जायचे. त्यामुळे सलग आणि पुरी न झालेली झोप असं असलं तरी केएमसी ही थेरपी मी नियमित केली ते ओवीचा मला होणारा स्पर्श आणि तिचा मिळणारा सहवास यासाठी. माझ्या खोलीत माझं बाळ माझ्या कुशीत नाही, दूर आहे याचं मला वाईट वाटायचं पण मी ते केएमसीचे एकूण सहा तास एंजॉय करायचे. केएमसीचा मला खूप फायदा झाला. ओवीचं वजन वाढत होतं केवळ या कारणासाठी नाही तर तिला मला त्यानिमित्तानं रोज भेटता येत होतं. तिच्याशी माझी रोज नव्याने ओळख होत होती. तिथल्या नर्स मला जेव्हा तिच्या सुधारणेबद्दल सांगायच्या तेव्हा इतका आनंद व्हायचा की सगळं विसरून जायचे मी. एक-एक ग्रॅमने वाढणारं वजन सुखावून जायचं. एखाद्या दिवशी केएमसी ही थेरपी कॅन्सल झाली तरी त्या वेळेत एनआयसीयूमध्ये जाऊन बाहेरूनच तिला बघायचे. 'सगळं ओके ना' असं नर्सना विचारायचे आणि परतायचे. 

ते ३२ दिवस माझ्या आयुष्यातले मला बरंच काही शिकवणारे होते. या प्रवासानं मला वेगळा अनुभव दिला. घरी आल्यानंतरसुद्धा ओवी दोन महिन्यांची होईपर्यंत मी ही थेरपी दवाखान्यात करत होते अगदी तशी नाही पण करत होते. प्रत्येक फीडनंतर अर्धा तास मी तिला घेऊन तशी बसायचे. मग ते मध्यरात्री २ ला असो किंवा पहाटे ४-५ वाजता. आजही अनेकदा मी तिला तसं काही मिनिटं का होईना घेऊन बसते. सहजच... आता ती जास्त चुळबुळ करते ही गोष्ट वेगळी. पण ते काही मिनिटं मनाला आनंद देतात. स्पर्श बरंच काही सांगून जातो असं म्हणतात. ओवीचा स्पर्श जणू मला 'मी आहे तुझ्यासोबत कायम. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर' असं प्रत्येक दिवशी सांगायचा आणि आजही सांगतो.

Friday, April 16, 2021

जमतं का त्याला, तिला, प्रत्येकाला??



तिला बऱ्याचदा गृहित धरलं जातं...

ती करेल, ती निभावेल, तिला जमेल,

तिनं करायलाच हवं.. तिला जमायलाच हवं... 

तिचं कामच आहे ते. तिचंच काम आहे ते.. 

तिची कसली स्वप्नं ?

तिला काही करायचं असलं की त्यावरही हरकत;

हे असं चालत नाही.. ते शोभत नाही... 

अशा चौकटी बांधणारे हात, नजरा असतात... 

स्वयंपाकच तर करतेस, घर तर आवरतेस.. 

इतकं काय त्यात !

तोही करतोच की स्वयंपाक.. देतो तिला एक दिवस आराम... 

पण पुढचं काय ??

स्वयंपाकाच्यानंतरही काहीतरी असतं... 

स्वयंपाकघर आवरणं, नीटनेटकं ठेवणं वगैरे..   

असं काही असतं?? खरंच ? 

ती काही बोललीच 

तर मेल इगो आहेच डोकं वर काढायला...

मनाविरुद्ध करत राहते ती सगळं

काहीही न बोलता... 

पण कधी बोललीच, 

तर 'फार कळतं का तुला', 'खूप खटकायला लागलंय तुला हल्ली' 

हे ऐकण्यासाठी तिचे कान असतात तयार...

हे बोलणारा पुरुषही असतो आणि स्त्रीही

हो स्त्रीसुद्धा... 

हे तिचं काम आणि ते त्याचं 

ही कामाची विभागणी लहानपणापासून तिच्या ओळखीची... 

तिला पर्याय 'ती'च हवी... 

तिची कामं करायला 'तो' नको..

मग तीही पुढच्या पिढीतल्या 'तिला' हेच सांगणार.. 

यात बदल झालाय का ? हो झालाय ना. 

पण सोयीनुसार....

आता तिला बदल हवा असेल तर आधी तिनेच बदलावं.. 

स्वतःला.. स्वतःच्या विचारांना..  

पण हेच होत नाही फारसं.. 

उशिरा का होईना तिनं बदलायचं ठरवलंच, 

तर कधी कधी नको तो शेवट होतो... 

तिला कुठे हवा असतो असा शेवट? नकोच असतो. 

तिला हवं असतं फक्त तिला समजून घेणं, तिच्या मनातलं ओळखणं,

तिला स्वतंत्र विचार करू देणं, तिला माणसासारखं वागवणं...

पण हे जमतं का त्याला, तिला, प्रत्येकाला?? 

#TheGreatIndianKitchen on #Amazonprimevideo !  


 

Thursday, March 18, 2021

प्रिय ओवीस...

प्रिय ओवी, 

एका स्त्रीचं आयुष्य ती आई झाल्यावर बदलतं असं म्हणतात. माझ्यासाठी तो दिवस आजचा. तू आज एक वर्षाची झालीस. मी साडे सात महिन्यांची गरोदर असतानाच तुझा जन्म झाला. 'प्री मॅच्युअर्ड' किंवा 'प्री टर्म' याबाबत ऐकलं, वाचलं होतं. तसंच अशी डिलिव्हरी होणारी मी पाहिली किंवा एकमेव स्त्री नाही याचीही मला जाणीव होती. त्यामुळे सगळं ठीकच होणार या विचाराने मी मानसिकदृष्ट्या तयार होते. तू पोटात असताना आम्ही 'तान्हाजी' बघितला होता. तू अशी अचानक आलीस म्हणून तुझा बाबा गमतीने म्हणतो; ओवीने सर्जिकल स्ट्राइक केला. 😅 पण असो.. तू आलीस आणि आमचं आयुष्यच बदलून गेलं. 


तुझ्या जन्मानंतरचा पहिलाच महिना खडतर प्रवासाचा होता. वजन या एकमेव मुद्द्यासाठी तुला एनआयसीयुमध्ये ठेवलं होतं. ३२ दिवसांनंतर तुला घरी आणलं. हा ३२ दिवसांचा प्रवास कधी कधी अगदी काही सेकंदांसाठी झपकन डोळ्यांसमोरून जातो आणि डोळे भरून येतात. पण मी लगेच भानावर येते. या प्रवासमुळेच मला एक वेगळी ताकद मिळाली आहे. तुला घरी आणल्यानंतर सुद्धा खूप काळजी घ्यावी लागली. घरातल्या सगळ्यांनी मिळून मेहनत घेतली. ते सगळे होते म्हणून मी आणि तुझा बाबा खंबीरपणे उभे राहू शकलो. जसजसे दिवस पुढे जात राहिले तसतशी तुझी प्रगती होत गेली. तुझ्या वजनाची तुलना अप्रत्यक्षरित्या झाली आहे, पुढेही होईल. 'खूपच छोटी आहे', 'नाजूक आहे ना खूप', 'वजन कमी वाटतंय ना' या अशा प्रतिक्रिया पुढेही येतील कदाचित. पण त्याकडे दुर्लक्ष करायचं हे मी मनाशी पक्कं केलंय. तुझ्यासाठी किती, काय आणि का योग्य आहे हे मला कळतं. वजन व्यवस्थित असणं गरजेचं आहेच पण ती एकमेव गोष्ट महत्त्वाची नाही. तू किती अँक्टिव्ह आहेस हेसुद्धा माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. हे अनुभवातून आलेलं शहाणपण आहे. 

मी आजवर कोणत्याच नात्यात आदर्श बनायचा प्रयत्न केला नाही, करणारही नाही. तोच नियम आई या भूमिकेला. मला आदर्श आई बनायचं नाही. मी तुझं सगळं किती चांगलं करतेय हे जगासमोर सिद्ध करायची मला गरज वाटत नाही. मी याचं दडपण घेत नाही, घेणार नाही. माझा सुद्धा आई होण्याचा हा पहिलाच अनुभव आहे. मीही शिकतेय. तू मोठी होताना मी सुद्धा आई म्हणून मोठी होतेय. या प्रवासात मी चुकेन, धडपडेन, चाचपडेन. तेव्हा तू आजवर जसं सांभाळून घेतलंस तसं सांभाळून घे मला. तू प्री मॅच्युअर्ड आहेस याबाबत मला कधीच कमीपणा वाटत नाही. हे सांगितल्यावर लोक हजार प्रश्न विचारतील म्हणून मी कधीच घाबरत नाही. कारण मला तुझ्याबद्दल खात्री वाटते. तू तुझ्या वेळेत, तुझ्या ताकदीनुसार सगळं काही मिळवशीलच. स्त्री आई झाली की तिचं आयुष्य बदलतं हे आता खऱ्या अर्थाने अनुभवतेय, जगतेय... 
आपल्या अनेक नातेवाईकांनी, माझ्या आणि चैतन्याच्या मित्र-मैत्रिणींनी सुदधा तुला अजून प्रत्यक्ष बघितलं नाहीये. पण यानिमित्ताने त्यांना मला सांगायचं आहे की, आपण लवकरच भेटू. तोवर ओवी आणखी मस्ती करू लागेल आणि तुम्हाला तिला भेटून आणखी मजा येईल. 😊

आज तू एक वर्षाची झालीस. खूप मोठी हो, तुझी प्रगती होवो, तुला हवं ते मिळो, उत्तम आरोग्य लाभो, अजून मस्ती करण्याची ताकद मिळो; याच शुभेच्छा ! 🤗

बाकी आम्हा सगळ्यांचं तुझ्यावर प्रचंड प्रेम आहेच ! 😘