काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र टाइम्समध्ये स्मिता कुलकर्णी यांचा 'कामे कामे कामे गं' हा लेख वाचला. हा लेख वाचला आणि आजूबाजूला, ओळखीपाळखीच्या काही स्त्रियांचे काही अनुभव, त्यांनी सांगितलेले किस्से आठवले. तसंच आपणही साधारण काय विचार करतोय हे लक्षात आलं. 'मला सर्व कामे जमलीच पाहिजे, लोक काय म्हणतील, कुटुंबीय काय म्हणतील, अशा प्रकारचे विचार करून गृहिणींमध्ये 'सामाजिक चिंता' वाढीस लागते. या विचारसरणीमुळे आज ७० टक्क्यांपेक्षा जास्त गृहिणी मानसिक अनारोग्याच्या विळख्यात सापडल्या आहेत'; असं लेखाच्या सुरुवातीलाच म्हटलं आहे. लेखात नैराश्य, अस्वस्थता, आजार अशा महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केलं आहे. पण मला वाटतं इथवर गोष्टी जाऊच द्यायच्या नसतील तर त्यासाठी स्त्रियांनीच प्रयत्न करायला हवा.
अनेक स्त्रियांना कामात कामं करायची आणि एकमागे एक अशी सलग कामं करायची सवय असते. मल्टिटास्किंग करण्यात स्त्रिया माहीर असतात असं म्हटलं जातं. पण हे मल्टिटास्किंग करण्याचं ओझं, दडपण अनेकदा स्त्रियाच नकळतपणे स्वत:वर लादून घेतात. घरातली रोजची त्यांच्या वाटणीची कामं म्हणजे खरं तर बरीचशी कामं झालीच पाहिजेत हे दडपण घेऊन वावरतात. घरी-दारी अमुक-तमुक कामांचा विचार करत सतत त्यातच गुरफटलेल्या असतात. मग या कामांच्या ओझ्याखाली दबून गेलेल्या त्यांच्या पदरी काय येतो तर; थकवा.... शारीरिक, मानसिक आणि भावनिक थकवा !
कामांची यादी कुठे लहान असते; ती तर मोठीच असते. पण ती रोजच्या रोज अपेक्षेप्रमाणे पूर्ण झालीच पाहिजे असा कुठे नियम आहे का? रोजच्या दहा कामांमध्ये काही कामं राहिली तरी काही बिघडत नाही. काही कामं ठरवून नाही केलीत तरीही फरक पडत नाही. त्या वेळेत ठरवून आराम केला तरी हरकत नाही. कारण आराम करणं, शरीराला, मनाला, भावनांना शांत ठेवणं हा हक्क आहे प्रत्येक स्त्रीचा. इतर कोणी याबाबत विचार करो अथवा न करो; तिनेच सगळ्यात आधी तिचा विचार करायला हवा.
अनेक गृहिणी आठवड्यातील ठरावीक दिवशी, नोकरदार स्त्रिया त्यांच्या सुट्टीच्या दिवशी घरातली साफसफाई करतात. खरं तर ही जबाबदारी फक्त तिची नाही ना. पण ती जबाबदारी फक्त तिचीच आहे असं तिनेच तिच्या मनाशी पक्क केलं असतं. नाही केली एखाद्या आठवड्यात साफसफाई म्हणून कोणी तिला गुन्हेगार समजणार नाहीय आणि केली म्हणून पुरस्कारही देणार नाहीय. पण काय ना आपल्याकडे लहानपणापासून गोष्टी इतक्या खोलवर रुजवल्या जातात की ते मुळासकट उपटून काढण्यासाठी बरेच कष्ट करावे लागतात. इतके की अख्ख्या एका पिढीचा काळ त्यात लोटला जाईल.
अनेकांना हा विषय कदाचित खूप क्षुल्लक वाटेल. इतकं काय त्यात, सगळेच करतात की,... आता तर घरकामासाठी बायकाही असतात मग याचा इतका बाऊ का करायचा असंही म्हणतील. पण.... घरकाम करण्यासाठी मदतनीस बायका असल्या तरी गोष्टी मॉनिटर करण्यासाठी तिलाच त्यात डोकवावं लागतं. त्या आल्या नाहीत तर बहुतांश वेळा तिलाच उभं राहावं लागतं. कशाकशात तिने डोकं गुंतवून ठेवावं? 'मटा'तल्या त्या लेखातलं एक वाक्य अगदी पटलं. 'आपण माणूस म्हणून जगायचं की मशीन म्हणून याचा विचार करणं महत्त्वाचं आहे.' तिने 'नाही' म्हणायला शिकलं पाहिजे. इतरांना नाही म्हणणं तर दूरच; सर्वात आधी तिने तिलाच ठणकावून सांगायला हवं की, 'तुला झेपत नाहीय... तू हे करायचं नाही'. मग ती गृहिणी असो किंवा नोकरदार स्त्री...
सगळ्याच घरात फक्त स्त्रियांनाच प्रचंड काम असतं असं नाही. काही पुरुषही तोडीस तोड काम करतात हे मान्यच आहे. हे सुखावणारं चित्र अनेक घरात बघायलाही मिळतं. पण अशा वेळी स्त्रियांना 'भाग्यवान आहेस हो' असं म्हटलं जातं. असं का.... एका लघुपटात हा विषय मांडला होता. त्यात नायिका नायकाला म्हणते तो संवाद खूप भारी वाटला होता मला.. 'वी आर नॉट लकी.... वी आर थँकफुल टू यू'...
माझ्या पिढीतल्याच अनेक स्त्रिया या सगळ्याला सामोऱ्या जात असतात. कामांच्या ओझ्याखाली दबून जातात. सगळी कामं व्हायलाच हवीत हा अट्टहास त्यांच्यात आत खोलवर असतोच असतो. पण याचा मानसिक, शारीरिक पातळीवर गंभीर परिणाम होऊ शकतात असं विज्ञानच सांगतं. आम्ही नाही का केली कामं, संसार, नोकरी असं आधीच्या पिढीचं म्हणणं असतं. पण काळानुसार जीवनशैली बदलते आणि जीवनशैली बदलली की इतर सर्व बाबींवरही परिणाम होतो आणि कमी-अधिक प्रमाणात तो होत राहणार हे आपण कधी मान्य करणार? दोन पिढ्यांमध्ये फरक असणारच. आमची पिढी जेवढी, जसं करते तेवढं आणि तसंच पुढची पिढी करेलच याची खात्री नाही. चक्र आहे हे.... स्वीकारायचं का आता तरी?
या सगळ्यात तिनेच ठाम भूमिका घ्यायला हवी. स्वतःचं मानसिक, शारीरिक, भावनिक आरोग्य उत्तम ठेवायचं असेल तर तिने बोलायला हवं. स्वतःला समजवायला हवं.
कधीतरी तिने स्वत:ला सांगायला हवं...
परफेक्ट नसलीस तरी ठिके... ठेव एखादं काम बाजूला आणि जा फिरायला.. मनसोक्त गाणी ऐक, पुस्तक वाच, गप्पा मार...एखाद्या दिवशी सगळे गजर बंद करून जाग येईल तेव्हा उठ... होऊ दे उशीर सगळ्या कामांना.. हरकत नाही... आणि सगळ्यात महत्त्वाचं...
तिने स्वत:ला दिवसातून फक्त एकदा म्हटलं पाहिजे.... तू कमाल आहेस.. एक नंबर आहेस....!
Khupach sundar lihila ahes...apratim varnan..
ReplyDeleteEkdum Perfect...👍
ReplyDeletekharach... asa pratyek bai ne swatala mhatala pahije
ReplyDelete